Header Ads

संभाजी भिडे यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचे न्यायालयाचे आदेश maha

कोल्हापूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाने दिले आहेत. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी भिडे यांच्या विरोधात २०१८ मध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्या खटल्याच्या कामी दि. ६ रोजी झालेल्या सुनावणीला भिडे हजर राहिले नाहीत. त्यामुळे, न्यायाधीशांनी कडक भूमिका घेत त्यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचा आदेश दिला.

येळ्ळूरमधील महाराष्ट्र मैदानावर १३ एप्रिल २०१८ ला कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या कुस्ती मैदानाच्या उद्‌घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भिडे हजर होते. त्यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होती. पण, भिडे यांनी त्या समारंभात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. म.ए.समिती उमेदवारांच्या विरोधातील उमेदवारांना त्यांची जागा दाखवावी. अनेक कुस्ती मैदाने पाहिली आहेत. पण, येळ्ळूर मैदानासारखे कुस्ती पाहिली नाही, असे त्यांनी म्हटले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी भिडे यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला होता. त्यामुळे, त्यांच्यावर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. भिडे यांच्यासह कुस्ती स्पर्धा आयोजक मिळून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. या खटल्याची सुनावणी गुरुवारी झाली. त्यावेळी सहा जण उपस्थित होते. उर्वरित चौघांपैकी मारुती कुगजी यांचे निधन झाले आहे. तर भिडे यांच्यासह अन्य दोघे गैरहजर होते. त्यापैकी भिडे यांच्यावर अटक वॉरंट बजाविण्याचा आदेश न्यायालयाने दिला. खटल्याची पुढील सुनावणी २४ मार्चला आहे. बचाव पक्षाकडून ॲड. शामसुंदर पत्तार व ॲड. हेमराज बेंच्चण्णावर काम पाहत आहेत.

No comments