Header Ads

खटाव तालुक्यात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे दर्शन khatav

वडूज : गुरसाळे ता.खटाव येथील श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात हिंदू बांधवांबरोबरच मुस्लिम समाजबांधवांनीही सहभाग घेतला आहे. विशेषत: ज्ञानेश्वरी वाचनात दादा-वहिनींबरोबरच भैय्या -भाभीही सहभागी झाले आहेत. या उपक्रमामुळे गावातील सामाजिक सलोखा वाढीस लागण्याबरोबरच हिंदू-मुस्लिम बांधवांत ऐक्‍य निर्माण झाले आहे. गेल्या वर्षीपासून हा अनोखा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा राबविला जात आहे.

शुक्रवारी या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरवात झाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी झांजपथकाचे सादरीकरण केले. या वेळी गावातून दिंडी काढण्यात आली. त्यानंतर श्री सोमेश्वर मंदिरासमोरील मंडपात ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानेश्वरी वाचनाचा प्रारंभ करण्यात आला. विशेषत: ज्ञानेश्वरी वाचनासाठी सर्व समाजातील हिंदू समाजबांधवांबरोबरच मुस्लिम समाजबांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यातही स्त्रियांचा सहभाग लक्षणीय दिसून येत आहे. ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानेश्वरी वाचनात सहभागी होण्यासाठी ग्रामस्थांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पारायण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी स्त्रिया व पुरुषांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन गाव परिसरातील प्रत्येक वस्तीवरील ग्रामस्थांना व बचत गटांतील महिलांना वेगवेगळ्या दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा पारायण सोहळ्यात मोठा सहभाग दिसून येत आहे. दररोज ३० ते १०० ग्रामस्थ ज्ञानेश्वरी वाचनात सहभागी होत आहेत. दररोज संध्याकाळी नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमही उत्साहात होत आहेत. श्री सोमेश्वर सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, गावातील मान्यवर तसेच सर्व समाजबांधव या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी प्रयत्न घेत आहेत. हिंदू-मुस्लिम समाजबांधवांच्या सलोख्यातून राबविण्यात येत असलेला हा पारायण सोहळा आदर्श हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक म्हणून ओळखला जात आहे.

No comments