Header Ads

उंब्रज-मसूर रस्त्यावर ट्रक आणि मोटारसायकलच्या अपघातात युवक ठार karad

उंब्रज : पाटण-पंढरपूर राज्यमार्गावर उंब्रज ते मसूर जाणाऱ्या रस्त्यावर मोटरसायकल आणि ट्रक यांच्यातील अपघातात युवक जागीच ठार झाला, तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वडोली भिकेश्वर (ता. कराड) गावाच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला. दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. नितीन पोपट कापुरे वय २५, रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, सध्या रा. माळीनगर, उंब्रज, ता. कराड असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. रितेश बबन गायकवाड रा.भीमनगर, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर, सध्या रा. माळीनगर उंब्रज असे अपघातात जखमी झालेल्याचे नाव आहे. जखमीस उपचारासाठी कराड येथे रुग्णालयात हलविण्यात आले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल वरुन दोघेजण उंब्रजवरुन मसूरकडे निघाले होते. वडोली भिकेश्वर गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पुलानजीक क्रेशर समोर ट्रक आणि मोटरसायकल यांच्या धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील नितीन कापुरे हा युवक ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर रितेश गायकवाड हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वडोलीचे पोलिस पाटील राजू रामुगडे तसेच तळबीड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी कराड येथे हलविले. तळबीड पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा करुन अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत.

No comments