Header Ads

पत्र्याच्या शेडमध्ये ५९ जनावरे क्रुरतेने ठेवली डांबून; जनावरांची सुटका करून तिघांना घेतले पोलिसांनी ताब्यात crime

सातारा : एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये तब्बल ५९ जनावरांना दाटीवाटीने पाय बांधून क्रुरतेने डांबून ठेवल्याची घटना खुंटेवस्ती, ता. फलटण येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. या सर्व जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने सुटका केली असून, याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शाहरूख जलील कुरेशी वय-२७, सुहेल जलील कुरेशी वय-२०, रा. मंगळवार पेठ, फलटण, राजू हुसेन शेख वय-१८, रा. निरावाघज, ता. बारामती अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, खुंटेवस्ती, ता. फलटण येथे ओढ्यालगत एक पत्र्याचे शेड असून, या शेडमध्ये बेकायदा जिवंत गायी, वासरे, बैल क्रुरतेने बांधलेले आहेत. त्यांची कत्तल करण्यासाठी वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचा आदेश दिला. एलसीबीची टीम शनिवारी दुपारी खुंटेवस्ती येथे पोहोचल्यानंतर एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये दाटीवाटीने जनावरे पाय बांधलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आली. त्यामध्ये ५३ वासरे, २ बैल, ४ गायींचा समावेश होता. या जनावरांची त्या छोट्याशा शेडमधून पोलिसांनी सुटका केली. ही सर्व जणावरे झीरपवाडी, ता. फलटण येथील सदगुरू गोशाळेत संगोपणासाठी पाठविण्यात आली आहेत. या ठिकाणी पोलिसांना १ आयशर टेम्पो, १ पिकअप टेम्पोही सापडला. टेम्पोमध्येही जनावरे पोलिसांना सापडली. ही दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली असून, वरील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार घोरपडे, विलास नागे, जोतीराम बर्गे, उत्तम दबडे, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, रवींद्र वाघमारे, संतोष जाधव, प्रवीण कडव, केतन शिंदे, धीरज महाडिक आदींनी ही कारवाई केली.

No comments