Header Ads

जावलीचे उपसभापती सौरभ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; चंद्रसेन शिंदे व विरेंद्र शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल crime

सातारा : जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांना कुडाळ येथील किसन वीर साखर कारखान्याचे संचालक चंद्रसेन शिंदे व कुडाळचे सरपंच विरेंद्र शिंदे यांनी ऊसतोड टोळ्यांच्या राहुट्या हटविण्याच्या कारणावरून जीवे मारण्याची धमकी दिली. सौरभ शिंदे यांनी याबाबत मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुडाळ येथील आपुलकी पेट्रोल पंपाजवळ शेते येथील रामचंद्र पवार यांच्या जागेत किसन वीर साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांच्या टोळ्या बसल्या होत्या. त्या जवळच उपसभापती सौरभ शिंदे यांचे प्लॉटींग असून या टोळ्यांमुळे माझ्या प्लॉटला गि-हाईक येत नाही. त्या टोळ्या तेथे ठेवू नका, ताबडतोब उठवा. असे त्यांनी पवार यांना सांगितले होते. मात्र, टोळ्या उठल्या नसल्याने सौरभ शिंदे व त्यांचे स्वीय सहाय्यक टोळ्यांच्या राहुटीजवळ आले व आताच्या आता टोळ्या उठवा, असे सांगितले. त्यावेळी किसन वीर कारखान्याचे संचालक चंद्रसेन शिंदे व कुडाळचे सरपंच विरेंद्र शिंदे त्या ठिकाणी आले. त्यांनी सौरभ शिंदे यांना तुला बघून घेतो, तुझी कातडी काढतो, असे म्हणून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्याबाबत सौरभ शिंदे यांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

No comments