Header Ads

कराडला टोळी युद्ध; अग्नीशमन दलाच्या गाडीवर दगडफेक करून पिस्तुल नाचवत माजवली दहशत crime

कराड : बुधवार पेठेत शनिवारी रात्रीच्या सुमारास दोन गटात तुफान राडा झाला. काही संतप्त युवकांनी दुचाकी जाळून खाक केली. काही ठिकाणी दगडफेकही झाली. त्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. दगडफेकीत पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीची काच फुटली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या घटनेत एका टोळीने पिस्तुल नाचवत दहशत माजवली. त्या प्रकाराने संतप्त महिला रात्री दीडपर्यंत पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसल्या होत्या. गरीबाने जगायच तरी कस ? आमची पोरं ते बिनधास्त मारत्यात. त्यांच्याकडे माणसे मारायची घोडे (पिस्तुल) आहेत. अशी किती घोडी आहेत त्यांच्याकडे ? त्याची आम्हाला आता भिती वाटायला लागलीय, असे काही महिलांनी गाऱ्हाणे मांडत टोळ्यांकडील पिस्तुलांकडेही पोलिसांचे लक्ष वेधले.

या घटनेची अधिक माहिती अशी बुधवार पेठेत मारामारी झाल्याचे समजातच रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील, फौजदार शिवराम खाडे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी त्वरीत घटनास्थळी पोचले. संतप्त जमावाला श्री. पाटील यांनी संशयितांना अटक करण्याचा शब्द दिला. त्यानंतर जमाव शांत झाला. चौकात जमलेल्या लोकांना पांगविण्यासाठी पोलिसांना रात्रभर कसरत कारावी लागली. त्या परिसरातील वातावरणात तणाव होता. पहाटेपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात होता. पोलिसांनी जमावाने जाळेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. ती कोणाची आहे, याचा तपास सुरू आहे. पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत. 

No comments