Header Ads

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या उपस्थितीत माणदेशी महोत्सवाचा प्रारंभ satara

सातारा : पश्चिम महाराष्ट्राचे आकर्षण असलेल्या माणदेशी महोत्सवाचा प्रारंभ गुरुवारी सातारा येथे करण्यात आला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. माणदेशी महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि विशेषतः माणदेशातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यसंस्कृती हे महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट देवून व कर्तृत्वाचा ठसा निर्माण करणाऱ्या महिला उद्योजकांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या. दि.२१ ते २५ नोव्हेंबर कालावधीत चालणाऱ्या महोत्सवामध्ये माणदेशी मटण, हुर्डा पार्टी,  मच्छी थाळी, अस्सल ग्रामीण फरसाण व शेवचिवडा, माणदेशी व सोलापुरी मसाले, कडक भाकऱ्या  ज्वारी, कडधान्य, पिठाचे जाते, लोकरी जेन, चपला, कपडे यासह अनेक स्टॉलचा समावेश महोत्सवामध्ये करण्यात आला आहे. दरम्यान उद्घानप्रसंगी माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप रोकडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, रेखा कुलकर्णी, वनिता शिंदे यांची उपस्थिती होती.

महोत्सवाचे उद्घाटन होण्यापूर्वी सादर करण्यात आलेल्या गजीनृत्य आणि मुलींच्या लेझिम पथकाचा गौरव जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. दि.२३ रोजी माणदेशी उद्योजिका पुरस्काराचे वितरण अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर दि.२४ रोजी जिल्हा परिषद व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत महिलांना आर्थिक भागभांडवल, मार्केटिंग व व्यवसाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याच बरोबर दि.२५ रोजी मुलींची कुस्ती आणि गजर महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

No comments