Header Ads

प्रतापसिंह हायस्कूलमध्ये कृषी शिक्षण पुन्हा सुरू करावे : डॉ. कृष्णराव कदम satara

सातारा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये कृषी शिक्षण सुविधा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी या शाळेचे माजी विद्यार्थी व राहूरीच्या कृषी विद्यापीठाचे निवृत्त डीन डॉ. कृष्णराव कदम यांनी केली आहे. याबाबत प्रसिध्दीमाध्यमांशी संवाद साधताना डॉ. कदम यांनी म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह न्यायमूर्ती गजेंद्रगडकर, लोकसभेचे माजी सभापती एस. आर. आळतेकर, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू रँग्लर बी. एस. महाजनी, डी. एन. दाभोलकर, धनजीशहा कूपर, अ‍ॅड. दादासाहेब करंदीकर, नरीमन कूपर आदींसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या शाळेत ज्ञानार्जन केले आहे. मलाही या शाळेत शिक्षण घेता आले, याचा मला अभिमान वाटतो आहे.

एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यात नामांकीत असलेल्या या शाळेची सध्या मात्र काही चांगली स्थिती दिसत नाही. शिक्षण क्षेत्रात 10+ 2+3 हे सूत्र लागू होण्यापूर्वी या हायस्कुलमध्ये इयत्ता आठव ते 11 वी व नंतर चार वर्षे कॉलेज असे वर्ग कार्यरत होते. तसेच आठवी ते अकरावीपर्यंत कृषी विषयाचे अध्यापनही केले जात होते. एकूण आठपैकी दोन विषय कृषीविज्ञानाचे होते. शेतीची मशागत आणि माती व्यवस्थापन तसेच शेती मशागत आणि माती व्यवस्थापन, याशिवाय पिके आणि पशुसंवर्धन असे विषयही येथे शिकवले जात असत. या हायस्कुलची बुधवार नाक्यालगत सात ते आठ एकर शेतीही होती. राजवाड्यातील वर्गांमध्ये बौध्दिक विषयांचे ज्ञानार्जन होत असले तरी प्रॅक्टीकल वर्कसाठी शेतीफार्मवर विद्यार्थी जात असत. बहुतेकवेळा या शाळेचे प्राचार्यही कृषीशाखेचे पदवीधरच असायचे.  मात्र नवा शैक्षणिक आराखडा सुरू झाल्यावर या हायस्कुलची स्थिती दयनिय झाली. या विद्याशाखेत आठवी ते दहावीचे वर्ग असले तरी ज्युनीअर कॉलेजचे वर्ग दिले नाहीत. तत्कालीन प्राचार्यांनी इयत्ता 11वी लव 12 वीला शेती शाळेचे स्वरूप देवून ते वर्ग हायस्कुलला जोडण्यासाठी शासनाला प्रस्ताव दिला होता. मात्र राजकीय उदासीनतेमुळे त्यात यश आले नाही. वास्तविक या हायस्कुलकडे स्वमालकीची शेती व प्रशिक्षीत शिक्षक वर्ग होता. जागेची अडचण नव्हती, सर्व इन्फ्रास्ट्रक्चरही तयार होती. तरीही या हायस्कुलला ज्युनिअर कॉलेज व शेती शाखेचे वर्ग न देता जिल्ह्यातील अन्य विद्यालयांना तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

विद्यार्थी दिनाच्या कार्यक्रमात तत्कालीने सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी प्रतापसिंह हायस्कुलचा वारसा जपण्यासाठी प्रस्ताव साददर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेलाकेले होते. याशिवाय या विद्यालयास आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याची मागणीही शासनाकडे करण्यात आली होती. दरम्यान पुण्यातील यशदाच्या धर्तीवर येथे अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचेही काहींनी सूचविले आहे. मात्र या सर्वांच्या बरोबरीने या हायस्कुलमध्ये पूर्वीप्रमाणे कृषी शिक्षणाची व्यवस्था करावी, हीच या शाळेचा नावलौकीक वाढविणारी बाब ठरेल आणि या हायस्कुलचे भूषण ठरलेल्या नामवंतांना आदरांजली ठरेल, असेही डॉ. कदम यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

No comments