Header Ads

चौकशांमधून सुटण्यासाठी काकांच्या पाठीत पुतण्याचा खंजीर : शालिनीताई पाटील kregon

कोरेगाव : देशात विश्‍वासघातकी राजकारणाला शरद पवार यांनीच सुरुवात केली. स्व. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसून त्यांचे चांगले चाललेले सरकार पाडणार्‍या शरद पवार यांना आज पाठीत खंजीर खुपसणे काय असते, हे चांगले कळले असेल. चौकशांमधून सुटण्यासाठीच काकाच्या पाठीत पुतण्याने खंजीर खुपसला. आज खर्‍या अर्थाने स्व. वसंतदादा पाटील यांच्या आत्म्याला चिरशांती लाभली आहे. आजवर विश्‍वासघातकी राजकारण करणे हेच पवारांना नडले असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीला शरद पवार हेच जबाबदार आहेत, असा थेट आरोप  माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केला. महाराष्ट्रात शुक्रवारी रात्रीपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर कट्टर पवारविरोधी म्हणून सर्व महाराष्ट्राला परिचित असलेल्या डॉ. पाटील यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना शरद पवार यांचा आदर्शच त्यांचा पुतण्या अजित पवार यांनी घेतला आहे.

आजवर ज्यांच्या पाठीत खंजीर खुपसले, त्यावेळी ५० वर्षांपूर्वी त्यांना जो काही त्रास झाला असेल, तो स्वत:ला कसा होतो, हे शरद पवार यांना अनुभवायला मिळाला आहे. नियतीचा नियम असून, जे पाप करायचे, ते येथेच फेडायचे, शरद पवार यांना या वयात पाप फेडावे लागले आहे, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. पवार कुटुंबीय हे सत्तेवाचून राहू शकत नाही, असा आरोप मी दोनच दिवसांपूर्वी केला होता. त्याचा प्रत्यय शुक्रवारी रात्रीपासून महाराष्ट्राला आला आहे. अजित पवार यांना आपली दुष्यकृत्ये लपवायची असल्याने आणि अनेक प्रकरणांच्या चौकशांच्या ससेमिर्‍यातून सुटण्यासाठी त्यांनी स्वत:च्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसला हे वास्तव आहे, असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणामध्ये अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे या वरचढ ठरत होत्या. प्रत्येक निर्णयामध्ये त्यांचा हस्तक्षेप होत असल्याने आणि वडिलांना पुतण्यापेक्षा मुलगी कधीही जवळची असल्याने नैराश्येतून अजित पवार यांनी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शालिनीताई पाटील यांनी केला आहे. 

No comments