Header Ads

शेंद्रे येथे महाविद्यालयीन युवकांना मारहाण करून लुटले ; एकावर गुन्हा crime

सातारा : शेंद्रे (ता. सातारा) येथील बसथांब्यावर थांबलेल्या महाविद्यालयीन युवकांना बुधवारी दुपारी मारहाण करत त्यांच्याकडील रोकड आणि शैक्षणिक साहित्याची बॅग हिसकावून नेल्याप्रकरणी ओमकार मनोहर पोतेकर (रा.शेंद्रे) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नागठाणे (ता.सातारा) येथे तेजस संतोष बागल (वय १६) हा राहण्यास असून तो शेंद्रे येथील महाविद्यालयात शिकत आहे. बुधवारी तो नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आला होता. दुपारी शैक्षणिक कामकाज संपवून तो महामार्गालगत असणाऱ्या बसस्टॉपवर इतर मित्रांसमवेत थांबला असतानाच त्याठिकाणी दारुच्या नशेत असणारा ओमकार पोतेकर हा आला. त्याने तेजस बागल व त्याच्या मित्रांकडे पैसे व मोबाईलची मागणी केली. पैसे व मोबाईल देण्यास नकार दिल्यानंतर पोतेकरने तेजस व त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांना मारहाण सुरु केली. सदर भांडणे सोडविण्यासाठी त्याठिकाणी आदित्य प्रवीण बागल (रा.नागठाणे) हा आला. त्याला देखील मारहाण करत पोतेकरने दगड फेकून मारला. हा दगड पायावर लागल्याने आदित्य हा जखमी झाला. यानंतर पोतेकरने अहमद हुसेन मुजावर याची बॅग हिसकावून पळ काढला. या बॅगमध्ये दोन हजारांची रोकड, महाविद्यालयीन ओळखपत्र व शैक्षणिक साहित्य होते. या घटनेनंतर तेजस बागल व इतरांनी सातारा तालुका पोलीस ठाणे गाठत घडल्याप्रकाराची माहिती उपस्थित पोलिसांना दिली. याची फिर्याद तेजस बागलने नोंदवली असून ओमकार पोतेकरवर जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेंद्रे येथील युवक बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या युवकांना मारहाण करत असल्याच्या घटना घडत आहेत. शेंद्रे येथील या गुंड प्रवृत्तीच्या युवकांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे. 

No comments