Header Ads

ग्रामसभेची परवानगी न घेता दिली क्रेशर व दगडखाणीला बेकायदेशीर परवानगी ; कारवाईची ग्रामस्थांची मागणी wai

वाई : वेळे येथे क्रेशर व दगडखाणीसाठी ग्रामपंचायतीने ग्रामसभेची परवानगी न घेता मासिक सभेतच या विषयाला मंजुरी दिली. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. सत्तेचा गैरफायदा घेत केलेले कृत्य आता चव्हाट्यावर येऊ पाहात आहे. वेळे येथे गट नंबर ५७७, ६४९ व ६५६ या क्षेत्रात माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार व त्यांचा पुतण्या श्रीकांत पवार यांनी दगडखाण काढणे, क्रशिंग करणे व खडी वाहतूक करणे या नवीन व्यवसायासाठी आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करण्यासाठी वेळे ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. सदरचा अर्ज हा ग्रामसभेत मांडून त्याला ग्रामसभेची मंजूरी मिळविणे अपेक्षित असताना देखील तो मासिक सभेतच मंजूर करण्यात आल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर लोकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. सदरचा अर्ज मासिक सभेत चर्चेला आला असता त्याला विरोध करणाऱ्या सदस्यांना डावलून मनमानी पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करत बेकायदेशीरपणे २१/०५/२०१९ रोजीच्या मासिक सभेत  ठराव क्र. १७/४ ने संमत करून परवानगी देण्यात आली.

सदर खडी व्यवसायासाठी प्रथम ग्रामसभेची परवानगी प्राप्त करणे क्रमप्राप्त असते. मात्र शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीची सत्ता असल्याने सर्व नियम व कायद्याला धाब्यावर बसवून अनागोंदी कारभार करण्यात आल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. गट नंबर ५७७, ६५९ व ६५६ या क्षेत्रांभोवती सर्वत्र बागायती जमिनी असून अनेक विहिरीदेखील आहेत. तसेच सदरचे गट नंबर हे पाझर तलावालगत येतात. येथून नजीकच्या अंतरातच भिलारेवाडी या ठिकाणी मानवी वस्ती असून पाणी पुरवठा विहीर व शिवकालीन तळे आणि भिलारेवाडीचे दैवत पद्मावती देवीचे मंदिर पाझर तलावाला लागूनच आहे. अनेक विहिरीदेखील या परिसरात आहेत. बागायती क्षेत्र असल्याने या परिसरात शेतीबरोबरच फळबागाही आहेत. पाण्याचे तीन वेगवेगळे बंधारेही या परिसरात आहेत. वनसंपदा व पाणी असल्याने या परिसरात अनेक वन्यजीव नजरेस पडतात. जर का येथे क्रेशर अथवा दगडखाण व्यवसाय चालू झाला तर हा संपूर्ण परिसर अत्यंत भकास पडणार आहे. त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे मानवी आरोग्याला हानी पोचणार असून अनेक बागायती पिके व फळबागा यांचे अतिशय नुकसान होणार आहे. बागायती जमिनी निकामी होणार आहेत. मनुष्य व पशुपक्षी यांना खूप मोठा धोका निर्माण होणार आहे. थेंबे थेंबे साचविलेले पाणी दूषित होणार आहे. स्फोट घडविल्यामुळे मोठया आवाजाने अनेक पक्षी मरणार आहेत तर मानवी जीवनासही हानी पोहोचणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून प्रदूषणही खूप होणार आहे. मोठ्या स्फोटांमुळे हादरे बसून जमिनीतील अंतर्गत पाण्याचा प्रवाह बदलणार आहे. शेतकरी वर्ग आधीच संकटांचा सामना करत असताना त्यात आणखी भर पडणार आहे.  त्यामुळे या सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक आहे.

वेळे ग्रामपंचायतीत सत्ताधारी लोकांनी मनमानी कारभार चालवल्याने त्याचा तोटा सर्वच नागरिकांना होणार आहे. सत्तेचा सदुपयोग करण्याऐवजी येथे मात्र दुरुपयोग होताना दिसत आहे. लोकांच्या मनात विश्वास संपादन करण्याऐवजी अविश्वास निर्माण होत आहे. नियम डावलून दिलेली परवानगी  नियमबाह्य असून ग्रामसभेची परवानगी नसताना मासिक सभेची मंजुरी कितपत योग्य आहे ? ग्रामपंचायत मनमानी कारभार करत आहे. बेकायदेशीररीत्या क्रेशर व दगडखाणीसाठी मासिक सभेने दिलेली परवानगी रद्द करून सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सरपंच व सदस्यांना याचा जाब विचारण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन व तक्रार ग्रामस्थांच्या सहिनीशी वाईचे तहसीलदार, प्रांत, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी व संबंधित कार्यालयांना वेळे व भिलारेवाडी येथील ग्रामस्थांनी केले आहे. त्यावर संबंधित कार्यालये काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments