Header Ads

'किसन वीर' कामगारांकडून पावणेसहा लाख मुख्यमंत्री सहायता निधी wai

भुईंज : अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरातील जनतेला मदत म्हणून किसन वीर साखर कारखान्याच्या कामगारांनी पावणेसहा लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आलेल्या या पावणेसहा लाखांच्या निधीसोबत कामगारांनी तांबवे, ता. कराड येथील ३० अपादग्रस्त कुटुंबांनादेखील १५० पत्र्याची पाने देवून त्यांच्या घरावर निवारा उभारण्याचे काम केले आहे.

महापूर आणि अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या काही भागात अक्षरशः हाहाकार उडाला आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून सर्वांचेच प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. शेतीचे, जनावरांचे आणि व्यवसायांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी येथील जनतेला मदतीची मोठी गरज आहे. समाजाच्या विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरु असताना किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आपल्या एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला. त्या ५ लाख ७६ हजार ७९६ रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे सुपूर्त केला. तत्पूर्वी तांबवे, ता. कराड येथे अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने जनतेचे संसार उघड्यावर पडल्याची माहिती मिळाल्यानंतर कामगारांच्यावतीने तातडीने १५० पत्रे तांबवे येथे नेवून देण्यात आले. धनादेश प्रदान करतेवेळी सातारच्या प्रांताधिकारी सौ. स्वाती देशमुख, सुनिल कदम, रामदास जाधव, यशवंत बाबर, जवाहर साळुखे, उत्तम तळेकर, सूर्यकांत संकपाळ, बाळकृष्ण जाधव, नारायण चुनाडे, मुरलीधर कणसे, राजेंद्र शिंदे, अरुण नवले, सौ. शीला जाधव-शिंदे, शिवाजी फरांदे, बंडू गायकवाड, उत्तम घाडगे, सौ. शोभा शिंदे, रामदास कदम, तानाची महामुनी, मिलिंद जाधव हे कर्मचारी उपस्थित होते.

कामगारांचे दातृत्व कधीच विसरणार नाही : मदन भोसले

गेली काही महिने किसन वीरच्या कामगारांना आम्ही पगार देवू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. लवकरच ही परिस्थिती बदलणार आहे. मात्र असे असूनही कामगारांनी स्वत:पुढे अनेक कौटुंबिक अडचणी असतानाही या राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत मनाचा जो उमदेपणा दाखवला त्याला तोड नाही. आपण अडचणीत असतानाही दुसऱ्यांच्या अडचणीत मदतीचा हात देणे ही अतिशय मोठी गोष्ट असून त्यामुळेच मला समस्त कामगारांचा प्रचंड अभिमान वाटत आहे. आयुष्यभर विसरता येणार नाही, असे त्यांचे हे दातृत्व असून त्याची नोंद किसन वीर व्यवस्थापनाकडे कायम राहिल, अशी प्रतिक्रिया कामगारांच्या या मदतीबाबत अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्त केली.

No comments