Header Ads

किल्ले अजिंक्यताऱ्याच्या १ कोटी २७ लाख रुपयांच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे ; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी satara

सातारा : सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.छ.शिवेंद्रराजे भोसले यांनी विशेष प्रयत्न करून सातारा जिल्ह्याचे वैभव असणाऱ्या किल्ले अजिंक्यतारा या रस्त्याच्या कामाला पर्यटन मंत्रालयाकडून १ कोटी २७ लाख रुपये मंजूर करुन घेतले. तसेच पावसाळयापूर्वी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ देखील मोठ्या थाटात करण्यात आला. काही नंतर रस्त्याचे काही काम पूर्ण देखील झाले. मात्र पावसाच्या पहिल्याच फटक्यात याच किल्ले अजिंक्यताऱ्याचा रस्ता काही ठिकाणी वाहून गेला तर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ठेकेदाराने किमान ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या रस्त्यांचे काम तरी प्रामाणिक करावे अशी मागणी करत, संबधित ठेकेदाराने केलेल्या कामाचे स्वायत्त संस्थेकडून निरीक्षण करावे तसेच ठेकेदाराला दिलेले लाखो रुपये मागारी घेऊन त्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे अशी मागणी संकल्प सेवाभावी संस्थेचे चिन्मय कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.

किल्ले अजिंक्यताऱ्याचा मार्ग जिल्हा परिषदेच्या अख्तारीत येत असून, पर्यटन विभागाकडून या रस्त्याचे काम करण्याचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येकाला किल्ले अजिंक्यताऱ्याबद्दल खूप आपलेपणा आहे. या किल्ल्याला राज्यभरातून तसेच राज्याबाहेरील पर्यटक भेट देत असतात. सकाळी व सायंकाळी लहानांपासून थोरांपर्यंत नागरिक या किल्यावर व्यायामासाठी येत असतात. या किल्ल्याच्या परिसरातील बहुतांश भाग हा त्रिशंकु असल्यामुळे तुटपुंज्या निधीमध्ये या भागातील विकासकामे करावी लागतात. या स्थितीत पर्यटन विभागाकडून तब्बल १ कोटी २७ लक्ष इतका मोठा निधी आल्यानंतर शिवप्रेमी व परिसरातील नागरिकांनी मंत्री जयकुमार रावल यांचे आभार देखील मानेले होते. मात्र काही महिन्यापूर्वी या कामाला सुरुवात झाली. साताऱ्यातील पूनम कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने या मार्गाचे काम हाती घेतले. रस्त्याचे काम सुरु झाल्यानंतर त्यातील काही रस्ता पावसाळा सुरु होण्याअगोदरच खराब झाला होता. मुसळधार पाउस झाला आणि या रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याचे चित्र आत्ता दिसत आहे. मुसळधार पाउस थांबताच रस्ता उखडल्याने ठेकेदार व अधिकाऱ्यांचे पीतळ उघडे पडले आहे.

आता रस्त्याला प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. पर्यटन विभागाने दिलेला निधी नुकत्याच पडलेल्या पावसात वाहून गेला असून, या नित्कृष्ट कामाला जबाबदार कोण ? पर्यटन विभाग ?, ठेकेदार ?, जिल्हा परिषद बांधकाम विभाग ? की नागरिक?. तसेच नवीन रस्ता किती वर्षानी व कोण करुन देणार ? असा सवाल येथील नागरिक उपस्थितीत करू लागले आहेत. या सर्व बाबींचा तात्काळ गांभीर्याने विचार होणे गरजेचे असून, पर्यटन विभाग व श्री.छ.शिवेंद्रराजे भोसले येथील नागरिकांना तसेच शिवप्रेमींना न्याय मिळवून देतील असा विश्वास येथील नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

....अन्यथा आमरण उपोषण : चिन्मय कुलकर्णी

शिवछत्रपतींच्या किल्ले अजिंक्यताऱ्याला जाणाऱ्या रस्त्याची वाट लावलेल्या अधिकारी व ठेकेदाराला शिवछत्रपती कदापि माफ करणार नाहीत. परंतु आपण निस्वार्थीपणे दिलेल्या निधीचा भ्रष्टाचार झाला आहे. हा मार्ग ठेकेदाराने ना नफा ना तोटा या तत्वावर करण्याचे ठरवले असते तर येथील नागरिकांनी व शिवप्रेमींना व आम्ही सर्वांनी भव्य सत्कार संबधित ठेकेदाराचा केला असता. ठेकेदाराने केलेल्या कामाचे स्वायत्त संस्थेकडून निरिक्षण करावे व त्या ठेकेदाराला दिलेले बील परत घेवून चांगल्या ठेकेदाराकडून परत नव्याने काम करुन घ्यावे. सध्याच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस ग्रामविकास मंत्री महोदयांकडे करावी. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता व दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कठोर करवाई करावी ही विनंती. तसे न झाल्यास आमच्यावर अन्याय झाला आहे. यासाठी आम्हाला सर्व नागरिक व शिवप्रेमी युवकांना आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा चिन्मय कुलकर्णी यांनी दिला आहे.

No comments