Header Ads

मेरुलिंग डोंगर खचल्याने नरफदेव गावातील १४ घरे बाधीत ; शिवेंद्रराजेंनी केली पाहणी satara

सातारा : मुसळधार पावसामूळे जनजीवन विस्कळीत झाले असून जावली तालुक्यातील नरफदेव येथे भुस्खलन झाल्याने मेरुलिंग डोंगरावर मोठ्या भेगा पडल्या आहेत. या दुर्घटनेमुळे नरफदेवमधील १४ घरे बाधीत झाली असून या घरांवर डोंगराचा काही भाग कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे. याची  माहिती मिळताच श्री.छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी तातडीने नरफदेव येथे भेट दिली. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शिवेंद्रराजे यांनी प्रशासनाच्या अधिका-यांना बाधीत १४ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची सुचना केली. तसेच या बाधीत कुटुंबांना स्वतः धान्य देण्याचे स्पष्ट करुन माळीणसारखा प्रकार घडू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी सुचना शिवेंद्रराजे यांनी यावेळी केली.

सातारा जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून सर्वत्र पुरपरिस्थितीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. अशातच अनेक ठिकाणी जमीन खचण्याचे प्रकार घडत आहेत. जावली तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील नरफदेव येथे भुस्खलन झाले असून मेरुलिंग डोगरावर भेगा पडल्या आहेत. पावसाच्या पाण्यामुळे खचलेला डोंगराचा भाग नरफदेव गावावर कोसळण्याची भिती निर्माण झाली असून ग्रामस्थांनी याबाबत शिवेंद्रराजे यांना कळवले. शिवेंद्रराजे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. यावेळी जावली पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गिरी, सरपंच सौ. शीतल साखरे, उपसरपंच वसंत साबळे, मंडाधिकारी अब्दुल शेख, तलाठी एस. एम. आंबवणे, ग्रामसेवक एस.बी. गायकवाड, सुनिल साबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवेंद्रराजे यांनी मेरुलिंग डोगर आणि नरफदेव येथील बाधीत घरांची पाहणी केली. डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात गावात पावसाचे पाणी शिरले असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या तीन ते चार खोल्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक घरांमध्ये उफळे फुटून पाणी बाहेर पडत आहे. डोंगर खचल्याने १४ घरे बाधीत झाली असून या १४ कुटुंबांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची सुचना शिवेंद्रराजे यांनी उपस्थित अधिका-यांना केली. याबाबत त्यांनी दूरध्वनीवरुन प्रांताधिकारी सौ. स्वाती देशमुख, तहसिलदार सौ. वैशाली आखाडे यांच्याशी संपर्क साधुन तातडीने उपायोजना करण्याच्या सुचना केल्या. यानंतर प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांनी आम्ही स्वत: घटनास्थळी येतो आणि उपाययोजना करतो, असे सांगितले. बाधीत कुटुंबांना निवारा उपलब्ध करुन द्या, त्यांच्यासाठी अन्नधान्याची व्यवस्था मी करुन देतो, असे शिवेंद्रराजे यांनी सांगितले. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मेरुलिंग डोंगरावरुन येणारे पावसाचे पाणी दुसरीकडे वळवण्यात यावे, जेणेकरुन भूस्खलन थांबेल. यासह इतर खबरदारीचे उपाय प्रशासनाने करावेत, अशा सुचना शिवेंद्रराजे यांनी अधिका-यांना केल्या. तसेच परिस्थितीवर प्रशासनाने  लक्ष ठेवून काळजी घ्यावी. नरफदेव गावातील ग्रामस्थांना कोणतीही इजा होवू नये, याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments