Header Ads

जावली तालुक्यातील घोटेघर येथे भुस्खलनाने भेगा पडल्या ; १२ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर satara

सातारा : मुसळधार पावसामूळे जनजीवन विस्कळीत झाले असून जावली तालुक्यातील घोटेघर येथे भुस्खलन झाल्याने जमीन खचली असून मोठ्या भेगा पडल्या आहेत. या दुर्घटनेमुळे घोटेघरमधील १२ कुटुंबांना बाधा पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी तातडीने घोटेघर येथे भेट दिली. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शिवेंद्रराजे यांनी प्रशासनाच्या अधिका-यांना विविध सुचना करुन बाधीत १२ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची सुचना केली. त्यांच्या सुचनेनुसार या १२ कुटुंबांना अतिवृष्टी कमी होईपर्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच माळीणसारखा प्रकार घडू नये, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी सुचना शिवेंद्रराजे यांनी यावेळी केली.

सातारा जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच अनेक ठिकाणी जमीन खचण्याचे प्रकार घडत आहेत. जावली तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील घोटेघरमध्ये गेल्या तीनचार दिवसांपासून जमीन खचण्याचा प्रकार घडत आहे. घोटेघर हे गाव डोंगरावर वसलेले असल्याने मोठी दुर्घटना घडू शकते, याबाबत शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याची सुचना करुन तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली होती. दरम्यान, पावसाचा जोर वाढतच असल्याने सोमवारी मध्यरात्री घोटेघर येथे भुस्खलन होवून डोंगराचा काही भाग खचला. सुमारे १ किलोमीटरपर्यंतच्या भेगा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातवरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी याबाबत शिवेंद्रराजे यांना कळवले. ग्रामस्थ भयभीत झाल्याने शिवेंद्रराजे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसिलदार रोहिणी आखाडे, जिल्हा परिषदेच्या भूगर्भशास्त्र विभागाचे जिओलॉजिस्ट टोणपे व संबंधीत अधिका-यांनाही बोलावून घेतले. यावेळी गोरख महाडिक, राजकुमार महाडिक, रामदास झाडे, शंकरराव रांजणे, बाबुराव रांजणे, संपत रांजणे, प्रकाश पडसरे, विजय कवी, आखेगणीचे सरपंच अर्जुन गावडे, शाम गुरुजी यांच्यासह रांजणी, घोटेघर, आखेगणी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिवृष्टी आणि पावसाच्या पाण्यामुळे घोटेघर येथे भुस्खलन झाले आहे. पाऊस आणखी काही दिवस असाच राहिला तर माळीणसारखी परिस्थिती उदभवू शकते. घोटेघर आणि रांजणी गावाला धोका पोहचू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. जमीन खचल्यामुळे घोटेघर येथील १२ घरांचे नुकसान होवू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून १२ कुटुंबांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सुचना शिवेंद्रराजे यांनी केल्या. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार १२ कुटुंबांना तात्पुरते शाळा अथवा मंदीर किंवा नातेवाईकांकडे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, भूस्खलनाचा धोका रांजणी गावाला पोहचण्याची शक्यता असल्याने शिवेंद्रसिंहराजे आणि प्रशासनाच्या टीमने रांजणी गावाचीही पाहणी केली. भुस्खलन होवून डोंगराचा भाग कोसळला तर, रांजणी गावाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याबाबत भुगर्भशास्त्र विभागाच्या अधिकायांना विचारणा करण्यात आली. टोणपे यांनी डोंगराचा भाग कोसळण्याची शक्यता नसल्याचे सांगितले. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून घोटेघर येथे येणारे पावसाचे पाणी दुसरीकडे वळवण्यात यावे, जेणेकरुन भूस्खलन थांबेल. यासह इतर खबरदारीचे उपाय प्रशासनाने करावेत, अशा सुचना शिवेंद्रराजे यांनी अधिकायांना केल्या. तसेच परिस्थितीवर प्रशासनाने लक्ष ठेवून काळजी घ्यावी. घोतेघर आणि रांजणी गावातील ग्रामस्थांना कोणतीही इजा होवू नये, याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments