Header Ads

कराड, पाटण तालुक्यात पूरस्थिती गंभीर ; पालकमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांना भेट द्यावी : राष्ट्रवादी युवकचे आवाहन satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड व पाटण तालुक्यातील पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली असून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी तत्काळ या तालुक्यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. गेले ८ दिवस पावसाने सातारा जिल्ह्याच्या काही भागात अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. तर दुसरीकडे माण व खटाव तालुक्यात आजमितीस देखील पाण्यावाचून जनता वंचित आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्री यांनी वास्तविक सातारा जिल्ह्याचा दौरा करणे गरजेचे असताना अजून पालकमंत्री साताऱ्यात फिरकले नाहीत. त्यांनी तात्काळ जिल्ह्याचा दौरा करावा अशी कळकळीची विनंती राष्ट्रवादी युवकचे सातारा जिल्हाध्यक्ष तेजसदादा शिंदे यांनी केली आहे.

तेजसदादा म्हणाले, कराड शहरासह तालुक्यातील अनेक गावे पूर्णपणे पूराने वेढली आहेत. ग्रामस्थांनी जनावरेही सोडून दिली आहेत. कराड तालुक्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने एनडीआरएफच्या जवानांना प्रशासनाने पाचारण केले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर तालुक्यातील लोकांवर आणखी गंभीर परिस्थिती ओढवू शकते. तसेच पाटण तालुक्यातील बहुतांश नदीकाठच्या गावांत पाणी शिरलेले आहे. धरणं १०१ TMC भरल्यामुळे धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. पाटण पासून कराड पर्यंत सर्वच नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. त्यामुळे सातारा जिह्यातील पूरग्रस्त भागांना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी तात्काळ भेट देवून त्यांच्या अडचणी समजवून घेवून तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी कळकळीची विनंती राष्ट्रवादी युवकचे सातारा जिल्हाध्यक्ष तेजसदादा शिंदे यांनी केली आहे.

माण-खटाव अजूनही दुष्काळाच्या छायेत

सातारा जिल्ह्यात एकीकडे मुसळधार पाउस सुरु आहे तर जिल्ह्याच्या दुसऱ्या बाजुला म्हणजेच माण व खटाव तालुक्यातील जनता अजून पाण्यापासून वंचित आहे. सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी तालुक्यात अजूनही पाउस न पडल्याने येथील नागरीकांचा मुक्काम चाराछावणीत सुरु आहे. या दुष्काळग्रस्तांची भेट घेवून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी दुष्काळी माण-खटाव तालुक्याचा देखील दौरा करावा असे आवाहन तेजसदादा शिंदे यांनी केले आहे.

No comments