Header Ads

जास्तीत जास्त नागरिकांना अटल पेन्शन योजनेत सहभागी करुन घ्या : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल satara

सातारा : भारत सरकारची अटल पेन्शन योजना ही वृध्दापकाळात सामाजिक व आर्थिक सुरक्षा देणारी योजना आहे.  यासाठी जिल्ह्यातील बँका व त्यांचे व्यवसाय प्रतिनिधींनी १८ ते ४० वयोगटातील जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेत सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनाच्या सभागृहात  अटल पेन्श्न योजनेसंदर्भात बँकर्स व्यवसाय समन्वयक व व्यवसाय प्रतिनिधींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बॅक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर वसंत गागरे, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक सुबोध अभ्यंकर,  स्टेट बँकेचे जिल्हा समन्वयक सुर्यकांत पाटील, अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक महादेव शिरोळकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यावेळी बोलतांना पुढे म्हणाल्या, जिल्ह्यात 35  लाख लोकसंख्या असून आतापर्यंत 24 हजार नागरिक या पेन्शन योजनेत सहभागी झाले आहेत. अटल पेन्शन योजना ही सर्वसामान्य नागरिकांच्या भावी वृध्दापकाळासाठी सर्वात चांगली योजना असून या योजनेच्या यशस्वीतेसाठी सर्व बँकांनी तसेच जिल्ह्यातील व्यवसाय प्रतिनिधींनी व्यक्तीगत पातळीवर लाभार्थ्यांशी संपर्क साधून या योजनेची माहिती  करुन दिली पाहीजे.  जे लाभार्थी आहेत, त्यांनी काही कारणांनी प्रिमीयम वेळेत भरला नाही तर या योजनेविषयी नकारात्मक संदेश पसरण्याची शक्यता आहे.  अशा परिस्थीतीत बँकाची भूमिका खूप महत्वाची असते.  बँकांनी याची काळजी घेऊन त्यांना प्रिमियम भरण्याविषयी वेळोवेळी  लोकांशी संपर्क साधला पाहिजे. यावेळी  या पेन्शन योजनेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्हा व्यवसाय प्रतिनिधी समन्वयक व व्यवसाय प्रतिनिधी यांचा सत्कार जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  कार्यशाळेचे प्रास्ताविक अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक  यांनी केले, स्वागत व सूत्रसंचालन  नितीराज साबळे  यांनी केले. कार्यशाळेस विविध बँकाचे व्यवसाय समन्वयक प्रतिनिधी, व्यवसाय प्रतिनिधी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments