Header Ads

पूरग्रस्तांचे अश्रू पुसले; पण डोळा गमावला ; अविनाश कराड यांना समाजातील दातृत्वाची गरज satara

सातारा : तारुण्य म्हणजे नवप्रेरणांचा खळाळता झरा. मानानं मिरवण्याचा आणि काही तरी नवीन करून दाखवण्याचा काळ. त्यातही याच वयात सेवापरायणता जपणाऱ्या उमद्या तरुणांची संख्याही मोठी. कोल्हापूरला महापुराचा विळखा पडला आणि राज्यभरातून अशीच तरुणाई मदतीचे ट्रकच्या ट्रक घेऊन कोल्हापुरात दाखल झाली. आपल्या अठरा मित्रांसह येथील पूरग्रस्तांचे डोळे पुसण्यासाठी आलेल्या पुण्याच्या अविनाश कराडचा परत जाताना अपघात झाला आणि त्यात त्याला डावा डोळा गमवावा लागला आहे. त्याच्यावर पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, शस्त्रक्रियेसाठी चार लाखांहून अधिक खर्च येणार आहे. अविनाश मूळचा नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्‍यातील प्रभूवडगावचा. शिक्षणाच्या निमित्तानं तो २०१० साली पुण्यात आला आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण होताच पुण्यातच एका कंपनीत फिल्ड सर्व्हिस इंजिनिअर म्हणून जॉब करू लागला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यापासूनच प्रत्येक पंधरा ऑगस्ट आणि २६ जानेवारीला तो आपल्या मित्रांसह विविध समाजोपयोगी उपक्रमात सक्रिय असतो.

कोल्हापुरातील महापुराच्या व्यथा साहजिकच त्यांना गप्प बसू देत नव्हत्या. पुण्यातून पूरग्रस्तांसाठी जीवनावश्‍यक साहित्याचे संकलन त्यांनी केले. त्याचे नीट पॅकिंग करून एका मोठ्या ट्रकसह त्यांचा हा अठरा जणांचा ग्रुप गुरुवारी कोल्हापुरात दाखल झाला. शिरोळ तालुक्‍यातील सैनिक टाकळी येथे मदतीची गरज असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि ही सारी मंडळी थेट गावात दाखल झाली. दिवसभर प्रत्येक घरात जाऊन त्यांनी जीवनावश्‍यक साहित्य दिले आणि पूरग्रस्तांना आवश्‍यक सर्व ती मदतही केली. सायंकाळी कंपनीतून दुसऱ्या दिवशी हजर राहण्याचा फोन आला आणि अविनाश आपला मित्र निखिल डोखे याच्यासह पुण्याकडे रवाना झाला. बाकीचे मित्र सैनिक टाकळीतच मदत कार्यात व्यस्त होते. शिरवळजवळ त्यांच्या मोटारीला अपघात झाला. निखिल गाडी चालवत होता, तर अविनाश मागे झोपला होता. त्यामुळे निखिलला स्टेअरिंग पोटात घुसल्याने जखम झाली. पण, तो लवकरच पूर्वपदावर येत आहे. अविनाशला मात्र डावा डोळा गमवावा लागला आहे. त्याच्यावर उपचारासाठी मित्रांसह त्याचे कुटुंब पुण्यात दाखल झाले आहे. त्यांच्या या धडपडीला आता समाजातील दातृत्वाची गरज आहे.


मदतीसाठी संपर्क - मोबाईल 99224 16052

आम्ही शेतकरी कुटुंबातले. शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. अविनाशचे करिअर आता कुठे सुरू झाले आहे. सतत दुसऱ्यांसाठी त्याची धडपड सुरू असते. त्याच्यावर अशी वेळ येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. 

रवींद्र कराड, अविनाशचा भाऊ

No comments