Header Ads

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल satara

सातारा : प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पी.एम.के.एम.डी.वाय.) ही योजना संपूर्ण देशात 9 ऑगस्टपासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेत 18 ते 40 वयोगटातील 2 हेक्टरपर्यंत शेतकरी असलेले शेतकरी पात्र आहेत. पात्र लाभार्थ्यांना 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रती महिना 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तसेच लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन मिळण्याची सुद्ध तरतुद या योजनेत करण्यात आली आहे तरी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड उपस्थित होते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात 4 लाख 33 हजार शेतकरी कुटुंबांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. यातील पात्र शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करणार आहे. त्यांचा हफ्ता त्यांच्या संमतीनुसार पी.एम. किसान योजनेच्या लाभातून कपात करण्यात येणार असल्याचे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधारकार्ड घेऊन आपले सरकार सेवा केंद्रावर जावे व नोंदणी करुन घ्यावी. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एन.पी.एस.), कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन स्किम यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी या योजनेस अपात्र असतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रकाशित प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेस अपात्र असतील. उच्च आर्थिक स्थितीतील शेतकरी लाभार्थी पुढीलप्रमाणे प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र नसतील. जमीन धारण करणारी संस्था, संवैधानिक पद धारण करणारी/केलेली आजी, माजी व्यक्ती, आजी- माजी मंत्री खासदार/आमदार, महापालिकेचे महापौर व जिल्हा परिषद अध्यक्ष. केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी, कर्मचारी (चतुर्थ श्रेणी/गट ड वर्ग कर्मचारी वगळून), मागील वर्षी आयकर भरलेल्या व्यक्ती, नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (सी.ए.), वास्तुशास्त्रज्ञ (आर्कीटेक्ट) इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती अपात्र असतील. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमुळे शेतकऱ्यांना एक आर्थिक कवच मिळणार आहे. या योजनेच्या जनजागृतीसाठी प्रत्येक गावांमध्ये शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे.

No comments