Header Ads

मुसळधार पावसाने महामार्गही ठप्प satara

सातारा : संततधार पावसामुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने कराड शहरातील राज्य मार्गावर असणारा कृष्णापुल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद केली आहे. तसेच कोल्हापूरला महापूर आल्यामुळे किनी टोलनाक्‍यापासून पुढे जाणारी वाहतूक बंद करण्यात आल्याने मंगळवारी सकाळपासून महामार्गही ठप्प झाला आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर पुण्याहुन कोल्हापूरकडे जाणारी सर्व वाहतूक बंद केल्याने महामार्गावरील सेवा रस्त्यावर सर्व वाहने थांबविण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने अक्षरश: कहर केला आहे. अविश्रांतपणे सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोयनेसह जिल्ह्यातील सर्वच धरणे भरल्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. विशेषत: कोयना आणि कृष्णेने धोक्‍याची पातळी ओलांडली असून अनेक ठिकाणी महापूर आला आहे. अनेक गावे संपर्कहीन झाली आहेत. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सुमारे सोळा फूट उचलून एक लाखाहून अधिक क्‍युसेक प्रतिसेकंद इतक्‍या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने कराड, पाटणला पुराचा तडाखा बसला आहे. मंगळवारी कृष्णा नदीवर असणाऱ्या पुलावरुन पाणी जाऊ लागल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कृष्णा-कोयना नदीवर असणारे पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूरला पावसामुळे महापूर आल्यामुळे किनी टोलनाक्‍यापासून पुढे जाणारी महामार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अगदी खंडाळा घाटापर्यंत सर्व वाहने महामार्गावर सेवा रस्त्यावरच थांबविण्यात आली आहेत.

No comments