Header Ads

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कराड परिसराच्या पूरस्थितीची हवाई पहाणी ; कोयनेचे दरवाजे ८ फुटांवर : कोयनेसह कृष्णेच्या पाणी पातळीत घट satara

सातारा : गेल्या आठवड्यापासून सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे आणि कोयना धरणासह जिल्ह्यातील इतर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कराड व पाटण तालुक्यातील कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना पूराचा मोठा फटका बसला आहे. कराड तालुक्यातील या पूरस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज हेलिकॉप्टरमधून हवाई पहाणी केली. सातारा जिल्ह्यात सुरु असणाऱ्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कोयना, धोम, कण्हेर, तारळी, उरमोडी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून या धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. संततधार पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना आणि कृष्णा नद्या धोकापातळी ओलांडून वाहत होत्या. या पूरचा फटका कोयना काठच्या पाटण, नावडी, तांबवे या गावांसह कराड शहराला बसला आहे. तसेच कृष्णा नदीकाठी असणाऱ्या कार्वे, आटके, दुशेरे, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक, बेलवडे बुद्रुक, मालखेड, वाठार आदी गावांना बसला आहे.

कृष्णा आणि कोयना काठी असणाऱ्या कराड आणि पाटण तालुक्यातील 7 हजारांहून अधिक लोकांचे स्थानांतर करण्यात आले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्या ठिकाणी त्यांना जेवणासह व आरोग्य सेवा पुरवविण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूरहून हेलिकॉप्टरने पूराने बाधित झालेल्या गावांची हवाई पहाणी केली. यामध्ये कराड शहरातील प्रितीसंगम परिसर, कार्वे, दुशेरे, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक, मालखेड वाठार आदी गावांची पहाणी केली. बुधवार पासून जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात पावासाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे 16 फुटांवर उघडण्यात आलेले कोयना धरणाचे दरवाजे सध्या 8 फुटांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे बुधवारी रात्री 9 वाजता धरणातून सोडण्यात आलेले 1 लाख 23 हजार 823 क्युसेक पाणी आता 69 हजार 75 क्युसेक एवढे कमी झाले आहे. त्यामुळे कराड आणि पाटण तालुक्यातील कोयना आणि कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.

No comments