Header Ads

वंचित बहुजन आघाडीमुळेच भाजपचे उमेदवार विजयी : लक्ष्मण माने satara

सातारा : लोकसभा निवडणूकीत किमान प्रकाश आंबेडकर यांचा विजय झाला असता तरी आम्ही त्यांच्यासोबत राहिलो असतो. त्याचबरोबर निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत आणि भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आघाडीचा राजीनामा दिला व प्रकाश आंबेडकर यांना देखील राजीनामा देण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी राजीनामा न दिल्यामुळे आम्ही स्वतंत्र महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. आमच्यासोबत मुस्लिम लीगसह डावे पक्ष सोबत आले आहेत. खा.ओवेसी यांची देखील आम्ही भेट घेणार असल्याची माहिती लक्ष्मण माने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आघाडीचे प्रवक्ते जयराज रजपूत, बाबुराव धोत्रे, भाऊसाहेब अडागळे, दगडूअण्णा सस्ते आदी.उपस्थित होते.

यावेळी बोलताना माने म्हणाले, लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीला कोणताच फायदा झाला नाही. उलट ज्यांचा पराभव करायचा होता त्या भाजपच्या जागा वाढल्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपचा पराभव करण्यासाठी ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत यावे, असे आवाहन पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले. दरम्यान, नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे 50 जागांचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती माने यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे 50 जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यापैकी पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूरमधून 4, कोल्हापूर 2, सांगली 1, पुणे 4 तर सातारा जिल्ह्यातून फलटणची एक जागा मागितली आहे. याबाबत लवकरच पुन्हा एकदा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत बैठक होवून पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती माने यांनी दिली. दरम्यान, लोकसभा निवडणूकीपुर्वीच आघाडीसोबत जाण्याचा निर्णय का घेतला नाही ? असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता माने म्हणाले, निवडणूकीपुर्वी आघाडीने आम्हाला गांभिर्याने घेतले नाही. त्यामुळेच त्यांचा पराभव झाला. वास्तविक कॉंग्रेसने आजपर्यंत नेहरू, इंदिरा गांधी व यशवंतराव चव्हाण यांचे विचार जेव्हा दूर केले. तेव्हापासून त्यांच्या अधोगतीला सुरूवात झाली. आता मात्र त्यांना आमच्याशी आघाडी करायची आहे. कॉंग्रेसने 70 वर्षात बहुजन समाजासाठी शिक्षण संस्था उभारल्या. जेणेकरून शिक्षित होवून नोकऱ्यांची संधी उपलब्ध झाली. दरम्यानच्या काळात जागतिकीकरण आणि खासगीकरणामुळे नोकऱ्यांवर गदा आली. हे खासगीकरण रद्द करण्याचा मुद्दा निवडणूकीच्या जाहीरनाम्यात निश्‍चितपणे असेल, असे माने यांनी सांगितले.

No comments