Header Ads

जनता सहकारी बँक आणि कर्मचारी संघाच्यावतीने हजारो वाहनचालकांना दिली मदत satara

सातारा : पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे पुणे-बेंगलोर महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हजारो वाहनचालकांना जिल्हयातील केसुर्डी ते तासवडे टोलनाक्यादरम्यान थांबवण्यात आले आहे. महामार्गावर अडकलेल्या या वाहनचालकांना मदत करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणा-या जनता सहकारी बँक आणि कर्मचारी संघाच्यावतीने वाहनचालकांना फूडपॅकेट आणि पाण्याचे वाटप विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापुर आला. या महापुरामुळे हजारो कुटुंब बाधित झाली. त्याचबरोबर पुणे-बेंगलोर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने सातारा जिल्हयातील केसुर्डी ते तासवाडे टोलनाक्यादरम्यान हजारो वाहनचालक अडकून पडले होते. या वाहनचालकांना मदत करण्यासाठी जिल्हयातील अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांची बांधिलकी जपणारी आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणा-या जनता सहकारी बँक आणि कर्मचारी संघाच्यावतीने वाहनचालकांना एक हजार फूड पॅकेट आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भागधारक पॅनेलचे पॅनेलप्रमुख, संचालक विनोद कुलकर्णी, महाराष्ट्र ट्रक टेम्पो संघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी, प्रा. विलास गवळी, ज्येष्ठ करसल्लागार अरुण गोडबोले, बँकेचे सरव्यवस्थापक प्रशांत शास्त्री, बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजाराम ऊर्फ डॅनी पवार, सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संचालक विनोद कुलकर्णी म्हणाले, ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात तसेच देशात कुठेही नैसर्गित आपत्ती आली आहे तेव्हा जनता सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच मदतीसाठी तत्पर राहिली आहे. केवळ व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता समाजाच्या अडीअडचणीच्या काळात जनता सहकारी बँकेने मदत करुन आपला खारीचा वाटा उचलला आहे. यापुढेही जनता सहकारी बँक नेहमीच आपत्तीच्या काळात मदत करण्यासाठी पुढाकार घेत राहिल असे सांगितले. बँकेचे सरव्यवस्थापक प्रशांत शास्त्री आणि कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजाराम पवार यांनी ही मदत उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व अधिकारी आणि सेवकांनी पुढाकार आणि परिश्रम घेतल्याचे सांगितले. महाराष्ट्र ट्रक टेम्पो संघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी जनता सहकारी बँकेने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले. यावेळी जनता सहकारी बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र ट्रक टेम्पो संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments