Header Ads

पक्षाचा काळ कठीण असला तरी शरद पवार यांच्यावर सातारा जिल्ह्यातील जनतेचा विश्वास आहे : आ.शशिकांत शिंदे satara

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी सत्ताधार्‍यांकडून मोठे प्रयत्न होत असले तरी सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून तो बालेकिल्लाच राहणार आहे. पक्षाचा काळ कठीण असला तरी अजूनही शरद पवार यांच्यावर सातारा जिल्ह्यातील जनतेचा विश्वास आहे. या पक्षाने आजपर्यंत अनेकांना पदे दिली मात्र तरीदेखील पक्षवाढीसाठी पदाधिकारी काम करताना दिसत नाहीत. पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत, त्यामुळे पक्षाचे काम करा, अन्यथा पदे सोडा, असा इशारा आ.शशिकांत शिंदे यांनी दिला. दरम्यान राष्ट्रवादीच्या बैठकीत दांडीबहाद्दर पदाधिकार्‍यांना कानपिचक्या घेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मरगळ झटकून काम करण्याच्या सूचना आ. शिंदे यांनी दिल्या. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा दि.२८ ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारा येथील राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीत आ. शिंदे बोलत होते. यावेळी आ.बाळासाहेब पाटील, आ.मकरंद पाटील, आ.दीपक चव्हाण, सत्यजितसिंह पाटणकर, सुनील माने, देवराज पाटील, सुभाषराव शिंदे, डी.के.पवार, रमेश पाटील, मोहन भोसले, तेजस शिंदे, कविता म्हैत्रे, समिंद्रा जाधव, सीमा जाधव, कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.

आ. शिंदे पुढे म्हणाले, सातारचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला डळमळीत करण्याचे काम सत्ताधार्‍यांकडून सुरु आहे. निवडणूक जाहीर होईपर्यंत काही लोकांना खेचण्याचे काम होणार आहे. यातील काही अफवाही असणार आहेत. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे. पक्षाचा काळ कठीण असला तरी अजूनही शरद पवार यांच्यावर सातारा जिल्ह्यातील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे सर्वांनी प्रामाणिकपणे पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत. सर्वांनी मरगळ झटकून कामाला लागावे. जे पक्षाचे काम करत नसतील त्यांच्याबाबत आम्ही कठोर निर्णय घेत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात अनेकांना पदे दिली मात्र काही पदाधिकारी पक्षाचे काम प्रामाणिक करताना दिसत नाहीत. पक्षाच्या बैठकांना उपस्थित न राहणार्‍या पदाधिकार्‍यांना ही समज देण्यात येणार आहे. परिणामांचा विचार न करता प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची तयारी पक्षाने ठेवली आहे.

आ. शिंदे पुढे म्हणाले, देशात आणि राज्यात सध्या भयंकर परिस्थिती आहे. सत्तेचा वापर करुन सुडाचे राजकारण करण्यात येत आहे. विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न सुरु आहेत. मात्र पवार साहेबांवर अजूनही जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता पक्षवाढीसाठी योगदान द्यावे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सर्वांनी आपली ताकद दाखवून द्यायची आहे. संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला पाहिजे, असे काम करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. आ.मकरंद पाटील म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्यांचा विचार करणारा, शरद पवार साहेबांना मानणारा पक्ष आहे. सध्या अफवांचे पीक सुरु असून कार्यकर्त्यांनी अशा गोष्टींवर लक्ष  देवू नये. सर्वांनी एकदिलाने पक्षाचे काम करावे. आ.बाळासाहेब पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी फोडण्याचे विरोधकांचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना टार्गेट करण्याचे काम सुरु आहे. पक्ष संघटना मजबूत असून कोणीही पक्षातून जाणार नाही. आ.दीपक चव्हाण म्हणाले, खा. शरद पवार साहेब यांनी पूरग्रस्त भागात मुक्काम करुन जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी केवळ हवाई पाहणी केली. त्यामुळे अजूनही जनतेला पवार साहेबांवर विश्वास आहे. शिवस्वराज्य यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. राजकुमार पाटील यांनी सूत्रसंचलन केले.

No comments