Header Ads

सातारा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याची शिवेंद्रराजेंची मागणी satara

सातारा : सर्वत्र पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा आणि जावली तालुक्यात अतिवृष्टीमुळे डोंगर खचणे, घरे पडणे यासह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे अक्षरशः हाहाकार उडाला असून जावली तालुक्यामध्ये भुस्खलन आणि डोंगर, दरडी कोसळणे यामुळे मोठी हानी झाली आहे. सातारा, जावली यासह सातारा जिल्ह्यात शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहिर करावा आणि त्वरीत पंचनामे करुन लवकरात लवकर बाधीतांना नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे केली आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पेरणी केलेली पिके गेली आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. मोरेवाडी येथे डोंगर कोसळल्याने अनेक घरे बाधीत झाली आहेत. तसेच जावली तालुक्यातील घोटेघर आणि मेरुलिंग डोंगर कोसळल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत. सातारा आणि जावली तालुक्यातील अनेक घरांमध्ये आणि शाळेतील खोल्यांमध्ये पाणी घुसले आहे. अनेक घरांमध्ये पाण्याचे उपळे लागले आहेत. अशा घटनांमुळे अनेक ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. सातारा, जावलीसह अन्य तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरडी कोसळणे यासह रस्त्यांची खड्डयांमुळे वाताहत झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत. नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन पडलेली घरे दुरुस्त करण्यासाठी आणि पुर्नबांधणीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आज अनेक लोकांचे संसार उघड्यावर आले असून त्यांना अन्नपाणी मिळणे मुश्किल झाले आहे. अशा लोकांना निवारा उपलब्ध करुन देणे आणि त्यांच्या पडलेल्या घरांची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. यासाठी शासनस्तरावरुन तातडीने निधी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी नुकसानीचे पंचनामे होणे अत्यावश्यक असून पंचनामे त्वरीत सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेला सुचना कराव्यात. पंचनामे त्वरीत करुन निधी उपलब्धतेसाठी गतीने हालचाल करावी आणि आपत्तीग्रस्त जनतेला दिलासा द्यावा. तसेच सातारा जिल्ह्यात ओळा दुष्काळ जाहिर करावा आणि नुकसान भरपाईसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

No comments