Header Ads

जनतेच्या भावनेचा यापुढे तरी खेळ खंडोबा करणे सर्व राजकीय मंडळींनी थांबवा : शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले satara

सातारा : बिजवडी आणि परीसरातील सोळा गावे सध्य परीस्थितीमध्ये कोणत्याच योजनेत नसून या गावांबरोबरच एकूण बत्तीस गावांचा पाणी प्रश्न कायम  आहे. हा प्रश्न सुटण्यासाठी आजही केंद्र व राज्य शासनाच्या परवानग्या घेणे बाकी आहे. तर उगाचच बैठकांचे व निधींचे कागदी घोडे नाचविणार्या नेत्यांनो निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पाणी प्रश्नाचे भांडवल करु नका असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी केले.

संजय भोसले म्हणाले की, फक्त बिजवडी भागाच्या पाणी प्रश्नासाठीच नव्हे तर माण खटावच्या पाण्यासाठी आम्ही जेलभरो केले आहे. पाण्यासाठी कळंबा जेलमध्ये जावे लागले. मुंबईत आझाद मैदानात मंत्रालयासमोर धरणे आंदोलने केली. अकरा दिवस उपोषण करुन पाणी प्रश्न कायम जागृत ठेवला. यावेळी सरकार व मुख्यमंत्री, याबरोबरच आमदारही कोण होते? आणि मग याला इतकी वर्षे का लागली? हा प्रश्नदेखील विचारु नये असे आम्हाला वाटते. संजय भोसले पुढे म्हणाले की, आमचेकडे देखील मंत्रालय स्तरावरील बैठकांचे अनेक वर्षांपासूनचे अनेक कागदी पुरावे आहेत. म्हणजेच पाणी आम्ही आणले का? अन पाणी आले का? याचे खरे उत्तर 'नाही' हे आहे. भाबड्या आणि आशावादी जनतेला अनेक राजकीय नेते व लोकप्रतिनिधी पाण्याचे गाजर दाखवत निवडणूक काळात कायमच फसविताना या दुष्काळी तालुक्याने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. बिजवडी भागातील गावांसाठी उपसा सिंचन योजना मंजूर केल्याच्या आरोळ्या ठोकणार्या व कागदं फडकविणारांना माझे आव्हान आहे की, जल आयोग लवादाची ५९९ टी.एम.सी. पाणी वाटपानंतरची या योजनेसाठी लागणार्‍या वाढीव पाण्याची मंजूरी दाखवा. जनतेच्या भावनेचा या पुढे तरी खेळ खंडोबा करणे सर्व राजकीय मंडळींनी थांबवा असे आवाहनही संजय भोसले यांनी केले आहे.

No comments