Header Ads

स्वातंत्र्य दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण ; जिल्हा वार्षिक योजनेतून पूरग्रस्त भागासाठी १२ कोटी : पालकमंत्री विजय शिवतारे satara

सातारा : जिल्ह्याला यावर्षी दुष्काळाचा आणि अतिवृष्टीचा सामना करावा लागलेला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कृषीक्षेत्राचे, पशुधनाचे, घरांचे व सार्वजनिक मालमत्तेची पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरु आहे. पुरग्रस्त ग्रामीण भागातील १ हजार ३५८ कुटुंबांच्या बँक खात्यावर १ कोटी ३४ लाख तर शहरी भागातील ६१४ कुटुंबांच्या बँक खात्यावर ८१ लाख इतके अनुदान जमा करण्यात आले असून रुपये ५ हजार प्रति कुटुंब प्रमाणे २८ लाख १० हजार रुपयांचे अनुदान रोखीने वाटप करण्यात आलेले आहे. दुष्काळ व पुरस्थितीच्या निवारणासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून विशेष बाब म्हणून १२ कोटींची तरतुदही करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  त्यानंतर ते बोलत होते.  ध्वजवंदनानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस, गृह रक्षक दलाची मानवंदना स्विकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.  या सोहळ्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. शिवतारे पुढे म्हणाले, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कृषी क्षेत्राचे, घरांचे पशुधनाचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीमुळे ज्या गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे तो सुरळीत करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीला आदेश देण्यात आले आहे.   मनुष्यबळ कमी पडू नये यासाठी इतर तालुक्यातील महावितरणचे कर्मचारी अतिवृष्टी भागात वर्ग करण्याचे आदेशही दिले आहेत अतिवृष्टीमुळे कृषी क्षेत्राचे, घरांचे तसेच पशुधनाचे नुकसान झाले आहे, याचे पंचनामे लवकरात लवकर व्हावे यासाठी    इतर विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्याची मदत घेण्याचे आदेश दिले आहेत.   रोगराई वाढू नये म्हणून पुरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागांमध्ये वैद्यकीय पथके पुरेशा औषधसाठ्यांसह तैनात ठेवण्यात आलेली आहेत.  अतिवृष्टीमुळे सातारा, जावली, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व खंडाळा तालुक्यातील  विस्थापित व बाधीत कुटुंबातील नागरिकांना शाळा, समाजमंदिरे तसेच  नातेवाईकांकडे तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन देण्यात आली होती. त्यांना दोन वेळेचे जेवण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, आरोग्यासाठी वैद्यकीय पथकांची नेमणुक करण्यात आलेली होती. अतिवृष्टी बाधितांना 13 हजार 100 किलो गहू व तांदळाचे वाटप करण्यात आले असून 6 हजार 185 लिटर केरोसिनचाही पुरवठ्यासह विविध संस्थांकडून मिळालेल्या जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आलेले आहे.

अतिवृष्टीमुळे नजर अंदाजाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात 38224.99 हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अहवालावरुन दिसून आले आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार या पिकांचे संयुक्त पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे, येत्या चार ते पाच दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करुन शासनास अंतिम अहवाल सादर सादर करण्यात येणार आहे. शासन नियमानुसार देय अनुदान शेतकऱ्यांना देण्याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. माण, खटाव व फलटण या दुष्काळी तालुक्यांतील पशुधन वाचविण्यासाठी 129 चारा छावण्या मंजूर करण्यात आलेल्या होत्या. या छावण्यांमध्ये 6 हजार 766 लहान जनावरे व 50 हजार 442 मोठी जनावरे असे एकूण 57 हजार 208 जनावरे या छावण्यांमध्ये होती. या चारा छावण्यांवर आत्तापर्यंत 8 कोटी 99 लाख 7 हजार रुपये खर्च करण्यात आलेले आहे. उरमोडी प्रकल्पाचा केंद्र शासनाने बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश केला आहे. या योजनेंतर्गत दुष्काळी भागातील कामे पूर्ण करण्यासाठी 483 कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रकल्पाचे काम 2022 मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये उरमोडी धरणातील अतिरिक्त पाणी उरमोडी उपसा सिंचन योजना कार्यान्वीत करुन खटाव व माण तालुक्यामध्ये सोडण्यात आले आहे. या परिसरातील तलाव व बंधारे पाण्याने भरुन दिले असून याचा शेतीसाठी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी लाभ होत आहे. जावली तालुक्यातील कण्हेर प्रकल्पाच्या जलाशयाच्या वरच्या भागासह एकूण 54 गावांना पिण्याचा पाणी पुरवठा करण्याकरीता बोंडारवाडी धरण बांधण्यास शासनाची तत्वत: मान्यता  मिळालेली आहे. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनानं प्राधान्य दिलं आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करुन सातारा जिल्हा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडवावा, असे आवाहनही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शेवटी केले. याप्रसंगी  उपजिल्हाधिकारी (महसूल) विद्युत वरखडकर, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी केले जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक

या वर्षी जिल्ह्याने दुष्काळाबरोबर पूरपरिस्थीतीचाही सामना केला आहे. दुष्काळीच्या वेळी चांगले नियोजन करुन तेथील जनतेला व जनावरांना पिण्याचे पाणी तसेच जनवरांसाठी चाराछावण्या उभे करुन पशुधन वाचविण्याचे मोठे काम केले आहे. तसेच पुरपरिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाने संवेदनशीलपणे काम करुन जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे. त्याबद्दल आज पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 

No comments