Header Ads

महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत satara

सातारा : मागील २४ तासांत महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वेण्णा लेकसह धोम धरणातील पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. तर, कृष्णा नदी पात्रात पाणी सोडल्याने नदी पात्राने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक भागांधील संपर्क यंत्रणा कोलमडली असून महाबळेश्वर- पोलादपूर घाटात दरडी कोसळल्यामुळे महाबळेश्वर पोलादपूर रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. एकूणच पाऊस आणि धुक्याने परिसर व्यापला असून पाऊस कमी होईपर्यंत महाबळेश्वर व पाचगणीला पर्यटकांनी येण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे . पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व प्रशासन कामाला लागले असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर – चौगुले व तहसीलदार मीनल कळस्कर व रणजित भोसले यांनी केले आहे.

महाबळेश्वरसह जावळी, वाई, खंडाळा तालुक्‍यात मुसळधार पाऊस सुरू आहे. महाबळेश्‍वर परिसरात मागील २४ तासात ११ इंच पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर जोर व जांभळी (ता वाई) खोऱ्यात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धोम धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे .यामुळे २४ हजार क्युसेक्स पाणी कृष्णा नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. सर्वत्र ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत, पाझर तलाव देखील भरले असल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे. कृष्णा नदी पात्रातील पाणी धोक्याची पातळी सोडून वाहत आहे. नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रा लगत राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून, त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था शासनाच्या व स्वयंसेवी संस्थांच्यावतीने करण्यात आली आहे. पाटण व कराड येथील पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी व आपत्कालीन व्यवस्थापनाला मदतीसाठी वाई येथील धोम धरणातील व महाबळेश्वरच्या वेण्णालेक मधील बोटी रवाना करण्यात आल्या आहेत.

चिपळून येथील पुर परिस्थिती हाताळण्यासाठी महाबळेश्वर पोलादपूर मार्गे निघालेली एनडीएफआरटीची टीम प्रतापगड (महाबळेश्वर) जवळ अडकलेली आहे. आंबेनळी घाटात तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तसेच दाभीळ गावच्या हद्दीत कोसळलेली दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आज रात्रीपर्यंत वाहतूक खुली होण्याची शक्यता आहे .धोमधरणातून २४ हजार कूयसेक्स पाणी सोडल्यामुळे वाई शहरातील महागणपती परिसरातील रस्त्यावर पाणी आले आहे. महाबळेश्वर, वाई तालुक्यात जमीन रस्ते खचण्याच्या घटना घडल्या आहेत .आत्तापर्यंत घराच्या भिंती कोसळणे पूर परिस्थिती गंभीर झाल्याने वीज वितरणासह, संपर्क यंत्रणा व पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक यंत्रणा देखील ठप्प झाल्या आहेत.

No comments