Header Ads

स्वातंत्र्यदिनी आजी-माजी सैनिकांनी उभारली स्वनिधीतून गावची स्वागत कमान satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेक सैनिक देशाच्या विविध भागात जाऊन देशसेवा करीत आहेत पण, आपल्या मातृभूमीला विसरले नाहीत. याची प्रचिती कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक गावला आली आहे. आजी-माजी सैनिकांच्या प्रयत्नातून संघटनेने स्वनिधीतून स्वातंत्र्यदिनी तिरंगा ध्वज फडकवून स्वागत कमान उभारण्याचा निर्धार पूर्ण केला आहे. या बद्दल परिसरातील ग्रामस्थांनी सैनिकांचे कौतुक केले आहे.

याबाबत माहिती अशी की, गेल्यावर्षी पिंपोडे बुद्र्क गावात स्वातंत्र्यदिनी तिरंगा ध्वजारोहण करताना आजी-माजी सैनिकांनी वेतन व सेवानिवृत्त वेतनातून गावाच्या प्रवेशद्वार नजिक स्वागत कमान उभारण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर भूमिपूजन करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती. संघटनेतील सैनिकांच्या आर्थिक योगदानामुळे आणि लोकवर्गणीतून सुमारे १३ लाख रुपये खर्च करुन वर्षभरात भव्य व आकर्षक कमान साकारली आहे. त्यामुळे देशाच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढणाऱ्या  लढावू सैनिकांच्या कमानीवरील प्रतिकात्मक कलाकृती लक्ष वेधून घेत आहेत. गावचे मुख्य आकर्षण ठरणाऱ्या या भव्य स्वागत कमानीचे उदघाटन काल स्वातंत्र्यदिनी गावचे सुपुत्र आणि सेना मेडल प्राप्त निवृत्त ऑनररी कॅप्टन भानुदास लेंभे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. या सोहळ्यास पिपोडे बुद्रुकचे सरपंच नैनेश कांबळे, उपसरपंच अमोल निकम, आजी-माजी सैनिक, ग्रामपंचायत व विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला सलामी व राष्ट्रगीताचे गायन करून तिरंगा ध्वजारोहण व स्वागत कमानीचा दिमाखदार लोकार्पण सोहळा  पार पडला. सैनिक संघटनेकडून स्मशानभूमीत पसायदान लिहिलेला फलकही लावण्यात आला. याबद्दल संघटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments