Header Ads

साताऱ्यात आशा वर्कर्सचा पुरस्कार सोहळा थाटात संपन्न satara

सातारा : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सातारा व पुणे येथील मुकुल माधव फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा आशा कार्यक्रम अंतर्गत आशा सेविकांना पुरस्काराचा वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्यास पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. दिपक पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक माधुरी उटीकर, जिल्हा समन्वयक करण जगताप, यांच्या समवेत जि. प. सदस्या शारदा ननावरे, पुणे येथील ससून रुग्णालयाच्या डॉ.शिल्पा नाईक, सिबायोसिस विद्यापिठाच्या डॉ. शारदा रमेश, डॉ. रिबेक जोसेफ, मिस रोमा, संचिता हॉस्पिटलचे डॉ.विवेक, केईएम हॉस्पीटलचे जी. जा. पुरोहित, डॉ. विद्या गोखले, डॉ. सुधीर धुमाळ, फिनोलक्सचे संतोष शेलार, मुकुल माधव फौंडेशनचे बबलू मोकळे व यासमीन मॅडम यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व धनवंतरी पूजनाने झाली. सर्व मान्ययवरांचे स्वागत तुळशीचे रोप व भेटवस्तू देवून झाल्यावर या पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार मिळालेल्या काही आशा वर्कर्सनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिपक पवार म्हणाले की, आशा सेविकांचे योगदान समाजात अतिशय मोलाचे आहे. गावातील प्रत्येक कुटुंब व व्यक्तीची बितम बातमी त्यांच्याकडून समजते. या पुरस्कारामुळे खरोखरच त्यांच्या योगदानाचे कौतुक होत आहे. तुटपुंज्या मानधनात त्यांचे काम आम्ही पाहत आहोत. वाढीव मानधनासाठी मी वैयक्तीक प्रयत्नशील आहे. जि.प.उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी आशा सेविका या खरोखरच समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांना मिळत असलेले मोलाचे मार्गदर्शन त्यांच्या कार्यात अधिक प्रगती करत आहेत. मुकुल माधव फौंडेशन सारख्या सेवाभावी संस्थेने दिलेले हे पुरस्कार या सेविकांचे मनोधैर्य उंचावणारे आहे.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी जिल्हा परिषदेच्यावतीने राबवलेल्या विविध सेवाभावी उपक्रमातील हा अतिशय मोठा आणि आदर्श कार्यक्रम असून या कार्यात सहभागी असणार्‍या सर्वच सेविका या पुरस्कारासाठी प्राप्त असल्याचे सांगून सर्वांचे कौतुक केले. यावेळी जिल्हास्तरीय गटप्रर्वतर्क पुरस्कारात लिंब येथील वनीता कदम यांना रु. 10 हजार, वाई मालतपुर येथील छाया गोळे यांना 6 हजार तसेच कवठे वाई येथील मनिषा डेरे यांना रुपये 4 हजार देण्यात आले. तसेच सवोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार प्रथम क्रमांक रु. 8 हजार मायणी खटाव येथील शबाना तांबोळी व दुसरा 6 हजार रुपयाचा पुरस्कार चिंचणेर वंदन येथील शुभांगी निकम यांना देण्यात आला. आरोग्य सखी पुरस्कार रुपये 7 हजार पुळकोटी माण येथील संगिता मारुती बनगर व रु. 5 हजारचा दुसरा पुरस्कार मालतपुर वाई येथील नंदा दत्तात्रय महागडे यांना देण्यात आला. याशिवाय एकूण 80 पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समारंभाचे सुत्रसंचालन श्‍वेता जगताप व संतोष शेलार यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षा अभियान जि. प. चे ज्ञानदेव शेलार, फिनोलेक्स कंपनीचे वितरक बन्सी शेठ, मनिष शेठ यांच्यासह जिल्ह्यातील हजारो आशा सेवीका यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments