Header Ads

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून, तरुणांनी स्वतः च्या पायावर उभे रहावे : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल satara

सातारा : प्रत्येक  तरुणाला नोकरी मिळले असे नाही,  तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावेत या उद्देशाने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आज प्रशासन तुमच्यापर्यंत पोहचून रोजगाराच्या संधी बरोबर विविध महामंडळाकडील  योजनांच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी वित्त पुरवठा करीत आहे. या महामंडळाकडील योजनांचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले. येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या उद्घाटनप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे  सहायक संचालक सचिन जाधव, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सचिन धुमाळ, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य आर.व्ही. शेजवळ, आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक मयुर घोरपडे उपस्थित होते.

कोणतेही काम छोटे नसते, कोठेही काम करण्याची संधी मिळाली तर काम करा आणि स्वत:चा कौशल्य विकास करा. आज महाविद्यालयांमध्ये रोजगार मेळावे होत आहे हे तुमच्या भविष्यासाठी खूप चांगले आहे. यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही कष्टाबरोबर आपले  सकारात्मक विचार ठेवा यश नक्की मिळेल. आजच्या रोजगार मेळाव्यात मुलींची संख्याही मोठी दिसत आहे. समाजात सन्मान मिळवायचा असेल तर स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे, असेही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी सांगितले. जिल्ह्यात 37 बँका असून 575 शाखा आहेत या शांखामतून पंतप्रधान जनधन योजनेचे खाते उघडावे. तसेच विविध महामंडळाच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी वित्त पुरवठा केला जातो तसेच विविध बँकामार्फम मुद्रा लोन अंतर्गत वित्त पुरवठा केला जातो याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोजगार मेळाव्यात जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर.व्ही. शेजवळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार जी.आर. वास्के यांनी मानले. या मेळाव्यास विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कौशल्य विकास विभागाचे केले जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार मेळाव्यांमधून तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे.  सन 2017-18 मध्ये 721, सन 2018-19 मध्ये 1 हजार 763 व 2019-20 मध्ये 310 युवकांना   रोजगार   उपलब्ध करुन दिला आहे. याबद्दल जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र  सहायक संचालक सचिन जाधव आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

No comments