Header Ads

आ. गोरेंचा हनिमून कोणाबरोबर झालाय हे पोलिसांनी शोधलय : डॉ.येळगावकर satara

सातारा : आ.जयकुमार गोरे हे माण-खटाव तालुक्याला लागलेला कलंक असून मतदारसंघातील आमची एकजूट बघून त्यांनी गरळ ओकणे सुरु केले आहे. मतदारसंघातील असंख्य प्रश्‍न प्रलंबित असताना त्यांनी घाणेरडे प्रकार सुरु केले आहेत. खंडणी, विनयभंग, अपहरणासाठी गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. कधी वंचित आघाडी, कधी काँग्रेसबरोबर ते राहत असल्याने त्यांचा नेमका हनिमून कोणाबरोबर झालाय ? हे पोलिसांनी आधीच शोधले आहे, अशी घणाघाती टीका माजी आमदार डॉ.दिलीप येळगावकर व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केली. दरम्यान वक्तृत्व, कतृत्व आणि वागणेही घाण असणार्‍या आमदारांना घालवण्यासाठीच आम्ही मतदारसंघात सर्वपक्षीय एकजूट केली असल्याचे ते म्हणाले.

आ.जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी बोराटवाडी येथे मेळावा घेवून डॉ. येळगावकर व अनिल देसाई यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना डॉ. येळगावकर व अनिल देसाई  म्हणाले, आ. गोरे यांचे वक्तृत्व, कतृत्व आणि वागणेही घाणेरडे असून घाणेरडे बोलण्यात ते राज्यात अग्रेसर आहेत. असली विषवल्ली मतदारसंघात फोफावली तर मतदारसंघाचे नुकसान होणार असल्याने आम्ही आ. गोरेंच्या टीकेला उत्तर देत आहोत. बाजारबुनगे कोण आहे? हे सगळ्यांना माहिती असून खटाव - माणच्या आत्तापर्यंतच्या आमदारांनी पोटतिडकीने अनेक प्रश्‍न मांडून ते तडीस नेले आहेत. मात्र विद्यमान लोकप्रतिनिधींच्या रुपाने या मतदारसंघाला काळीमा फासण्याचे काम सुरु आहे. आपण ज्यांच्यामुळे मोठे होतो त्यांना ते पायदळीच तुडवतात. आता त्यांचे दिवस संपले असून मतदारसंघातील जनता आमच्याबरोबर आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षातील असलो तरी आमच्यात कधीच दुरावा नव्हता. वैचारिक मतभेद असले तरी सकारात्मक विचाराने आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. नकारात्मक असलेल्या घाणेरड्या व्यक्तीला घालवण्यासाठी आमची एकजूट कायम राहणार आहे. म्हणाले, बोराटवाडीच्या मेळाव्याच्या दोन दिवस अगोदर आमदार वंचित आघाडीच्या पदाधिकार्‍यांना भेटले. सांगलीतील काँग्रेसच्या कार्यक्रमातही होते. त्यामुळे त्यांचा हनिमून वंचित बरोबर की काँग्रेसबरोबर झालाय असा प्रश्‍न पडत आहे. त्यांचा बाहेरख्याली पणा असल्यामुळे जनताही संभ्रमात पडली असल्याचे डॉ. येळगावकर म्हणाले.

डॉ. येळगावकर म्हणाले, मायणीत वर्षात एकही टँकर लागला नाही, रेडकार्ड बदलून येलो कार्ड मिळाले आहे. पाईपलाईनही दुरुस्ती आहेत मात्र आ. गोरे बोराटवाडीत बसून मायणीकरांची मापे काढत आहेत. त्यांच्या बोराटवाडी, बिदाल, आंधळीची काय अवस्था आहे याचा आधी त्यांनी विचार करावा. त्यामुळे आमची मापे काढण्याचा त्यांना अधिकार नाही. पतंगरावांनी सांगलीला पाणी पळवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस आमदार गप्प का होते? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेही येळगावकर म्हणाले. बारामतीकरांच्या गाडीत आम्ही नाही तर तेच बसत होते हे सर्वांनी पाहिले आहे. जी चावी बोधट झाली आहे त्यांची आम्हाला गरज वाटत नाही, असेही येळगावकर म्हणाले. अनिल देसाई म्हणाले, आमचा पक्ष आणि आम्ही संस्कृती मानणारी मंडळी आहोत. आमच्यात ठरल्यावर साखरपुडा होतो. नंतर लग्न, पूजा आणि नंतर हनिमून होते. यांच्यात ठरल्यावर हनिमून होत असल्याने असल्या प्रवृत्ती पक्षाला परवडणार्‍या नाहीत. भाजपात प्रवेश मिळण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरु आहे. मात्र यांचा इतिहास तपासल्यावर यांना पक्षप्रवेश मिळणार नाही. पृथ्वीराजबाबा, आनंदराव पाटील, धोंडीराम वाघमारे यांना आ. गोरेंनी काय वागणूक दिली हे सर्वांना माहित आहे. खंडणी, अपहरण, फसवणूक आदी गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्यांनी आमची मापे काढू नयेत. आम्ही रणजितदादांचे काम केले नाही असे म्हणणारा जयकुमार काय? रोड कारकून नेमला होता का? असा सवालही देसाई यांनी उपस्थित केला. यावेळी पं. स. सदस्य तानाजी काटकर, माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर खरात, वर्धनगडचे सरपंच रमेश जाधव, शिरसवडीचे सरपंच संतोष माळी आदी उपस्थित होते.

‘पैसे कमवणे, बाहेरख्याली पणाची रिस्कच’

आ. गोरे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक रिस्क घेतल्याचे  मेळाव्यात म्हटले होते. याबाबत बोलताना डॉ. येळगावकर म्हणाले, मतदारसंघात पवनचक्क्या, वाळू, सोलरप्रकल्प याच्या माध्यमातून केवळ पैसे कमवण्याची आणि बाहेरख्याली पणाची त्यांनी रिस्कच घेतली आहे. तालुक्यात दहा वर्षात त्यांनी कोणती कंपनी आणली? कोणती एमआयडीसी आणली? याचे उत्तर द्यावे. आम्ही भाजपाची संस्कृती जपणारी माणसे असून तुम्ही आमची मापे काढू नयेत, असे डॉ. येळगावकर व देसाई म्हणाले.  

आ. गोरेंकडून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न

आ. गोरे यांनी मतदारसंघातील अनेक कामांचे फुकटचे श्रेय घेण्याचा सपाटा लावला आहे. उरमोडीचे पाणी2006 ला आले. तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार, अजित पवार यांच्या उपस्थितीत या पाण्याचे पुसेसावळीत पूजनही झाले होते. मात्र हे पाणी मीच आणले असा डांगोरा ते पिटत आहेत. त्यांनी नवीन कोणती योजना आणली याचे उत्तर द्यावे. गलिच्छ आरोप करण्याआधी त्यांनी विकासावर बोलण्याची गरज आहे. टेंभू योजनेचे पाणी अनिल देसाई व माझ्या प्रयत्नामुळे आले. मग आ. गोरेंनी नेमके कुठले पाणी आणले याचे उत्तर द्यावे, असेही डॉ. येळगावकर म्हणाले. 

...तर जशास तसे उत्तर देऊ : अनिल देसाई 

30 तारखेला काही झाले नाही, 10 तारखेच्या यादीत यांचे नाव नाही त्यामुळे ते सैरभेर झाले असून मतदारसंघातील भाजपा नेत्यांना डॅमेज करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. 10 वर्षांत यांनी जनतेवर अन्यायच केला आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनता त्यांना वैतागली असून आमच्यावर अथवा आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका केल्यास आम्ही पण जशास तसे उत्तर देवू असा इशारा अनिल देसाई यांनी यावेळी दिला.  

आ. गोरेंचे कारनामे लवकरच मुख्यमंत्र्यांना सांगणार : अनिल देसाई 

साखरपुडा न करताच गोरेंनी नक्की कुणाशी हनिमून केले, असा सवाल विचारताना अनिल देसाई म्हणाले, अशी प्रवृत्ती काय असेल याचा विचार करा. लवकरच मुख्यमंत्र्याना भेटून गोरेंचे कारनामे सांगणार आहोत.  पाणी प्रश्नावर मतदारसंघात यांनी केवळ चमकोगिरी केल्यामुळे  माणच्या मतदारसंघातून गोरे यांना हटवण्याची मोहिम हाती घेतली आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी म्हणून घ्यायला यांना लाज वाटायला हवी , नाहीतरी त्यांची राजकीय आत्महत्या ठरलेली आहे. थेट हनिमून करणारी अपप्रवृत्ती माण तालुक्याला परवडणारी नाही,  असा टोला देसाई यांनी गोरे यांना लगावला.

..तर गोरेंना भाजपाचे पाय चाटण्याची काय गरज? 

कर्नाटक हद्दीवरून जी बनावट दारू महाराष्ट्रात येते त्याच कनेक्शनं तपासल्यास बर्‍याच गोष्टी प्रकर्षाने समोर येतील, असा खळबळजनक गौप्यस्फोट डॉ.  येळगावकर यांनी केला. माणच्या राजकारणात आमचा दोन्ही गोरे बंधूना विरोध आहे. शेखर गोरे यांना आम्ही मागच्या वेळेस मदत केली होती त्यामुळे त्यांनी उमेदवारीचा फार आग्रह न करता आमची मदत करावी ,अशी अपेक्षा येळगावकर यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही खासदारांचे काम केले नाही, अशी बडबड करणार्‍या गोरेंनी मधली दलाली बंद करावी. आमचे काम आमच्या पक्षश्रेष्ठींनी पाहिले आहे. माण मतदारसंघात भाजपच्या ज्या सभा झाल्या त्यांचे नियोजन देसाई व आम्हीच केले होते. जर गोरे यांची स्वतंत्रपणे निवडून येण्याची क्षमता असेल तर त्यांनी भाजपचे पाय चाटण्याची काय गरज आहे अशी सडकून टीका येळगावकर यांनी केली.

No comments