Header Ads

उरमोडीचे पाणी दुष्काळी माणगंगा नदीत सोडण्यासाठी केलेल्या उपोषणाला यश satara

सातारा : कोल्हापूर-सांगली-सातारा जिल्ह्यातील काही भागाला महापुराचा फटका बसला आहे. तर दुसऱ्या बाजूला दुष्काळी भागातील माणगंगा नदीत उरमोडीचे वाया जाणारे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी म्हसवड ता. माण येथे निवृत्त अभियंता व पत्रकार यांनी आमरण उपोषण केले. त्यानंतर उरमोडीचे पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन माणचे तहसीलदार सौ बी एस माने यांनी दिल्यानंतर उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती निवृत्त अभियंता सुनिल पोरे, पत्रकार पोपट बनसोडे, धनंजय पानसंडे, करण पोरे व उपोषणकर्त्यांनी दिली आहे.

माण तालुक्यात सतत तीव्र दुष्काळ पडत आहे. पावसा अभावी दुष्काळी भागातील शेतकरी व त्यांची जनावरे छावणी मध्ये गेली आहेत. ९१ चारा छावण्यात सुमारे ३० हजार जनावरे असून १०१ टॅकरव्दारे माणच्या जनतेची तहान भागवली जात आहे. शेतीला पाणी नसल्याने माण तालुक्यात बरोजगारी वाढत चालली असून तरूणवर्ग स्थलांतर करू लागला आहे. या भहावह पार्श्वभूमीवर निवृत अभियंता संघटनेचे माजी राज्यअध्यक्ष सुनिल पोरे, पत्रकार  पोपट बनसोडे, धनंजय पानसांडे व करण पोरे यांच्यासह भूमिपुत्रांनी दि.१५ ऑगस्ट रोजी म्हसवड येथे महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणास दुष्काळी भागातील लोकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला होता. माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे, लोकशाही चिरायू होवो संघटनेचे आप्पासाहेब जगताप, शहाजी गुजर, नितीन शिंदे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे, आर.पी.आयचे दादासाहेब ओव्हाळ व मान्यवरांनी  माणगंगा नदीत उरमोडी धरणाचे पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, कृष्णा खोरे महामंडळ कार्यकारी अभियंता विजय घोगरे यांचेकडे आग्रही भुमिका मांडली होती. मात्र, पाणी सोडण्याच्या वीज बिला बाबत प्रश्न उपस्थित केला. अखेर उपोषण सुरू करताच जिल्हा प्रशासन हादरले होते. उपोषणस्थळी माणच्या तहसीलदार सौ.बी.एस.माने यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या आदेशान्वये दि.२५ऑगस्ट पर्यंत दुष्काळी माण तालुक्यातील दिदवाघवाडी, दिवड, वाकी, म्हसवड, देवापुर, पळसावडे या गावच्या ग्रामपंचायती कडून पाणी सोडण्याचे लेखी प्रस्ताव घेऊन माणगंगानदीत पाणी सोडण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. माण तालुक्यात चारा छावण्या व टँकरने पाणी पुरवठा होत आहे. हे थांबविण्यासाठी उरमोडीचे पुराच्या माध्यमातून पाणी सोडावे याची लेखी मागणी केली होती. त्याकडे दुर्लक्ष करून दुष्काळी भागातील लोकांवर उपोषणाची वेळ आणली आहे. अशा जिल्हा प्रशासनाचे पालकमंत्री विजय शिवतारे कौतुक करीत आहेत. अशा शब्दात दुष्काळी भागातील शेतकरी व लोकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी जिल्हा प्रशासनाने देर आया,, दुरुस्त आया,, ही भूमिका घेतली त्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.

No comments