Header Ads

अतिक्रमणे कायम करून घेण्यात शासनाची उदासीनता ; खोडद ता.सातारा येथील १२ कुटुंबे रस्त्यावर satara

सातारा : मौजे खोडत ता.जि.सातारा या गावातील गट नंबर २० चा गायरान जागेमध्ये २० वर्षापासून अतिक्रमण करून राहिलेली १२ कुटुंबे आज रस्त्यावर आलेली आहेत. २०११ च्या शासन निर्णयानुसार अतिक्रमणे कायम करून त्यांना त्या जागेवर शासकीय योजना (घरकुल) देण्याबाबतच शासन परिपत्रक असताना देखील केवळ ग्रामपंचायतीच्या आडमुटे धोरणामुळे त्या कुटुंबीयांना त्यावेळेस कोणत्याच प्रकारचे दाखले (रहिवासी इ.) देण्यात आले नाही हेच कारण पुढे करून आजपर्यंत ग्रामपंचायतीने चालढकल करून १२ कुटुंबे रस्त्यावर आणली आहेत. या नागरिकांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ द्यावा या मागणीचे निवेदन मा.जि.प सदस्य संदीपभाऊ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी संगीता सत्वदीर, शुभांगी चव्हाण, अश्विनी वाटकर, शीला माळी, अशोक वाटकर, राजेश आवळे, संतोष जाधव, गंगुबाई आवळे, संभाजी सत्वदिर, महेश भिसे, संतोष आावळे, शोभा भुजबळ, जगूताई कांबळे, कुंदा येवले आदी खोडद ग्रामस्थ उपस्थित होते.


खोडद येथील अतिक्रमण करून राहिलेल्या कुटुंबीयांकडे लाईट, रेशन कार्ड व शाळेचे दाखले आहेत. हे सर्व नागरिक २०११ पूर्वीचे म्हणजेच २० वर्षांपूर्वीचे असून देखील त्यांना नियमित करण्याची कार्यवाही ग्रामपंचायतीकडून होत नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतचा अहवाल मागवण्यासाठी ११ वेळा संबंधित ग्रामपंचायतीस पत्रव्यवहार केला असून आज अखेर ग्रामपंचायतीकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सातारा जिल्ह्यातील काही भागात पावसाने थैमान घातले आहे. खोडद येथील पावसामुळे ३ घरे जमीनदोस्त झाली आहेत. राहिलेल्या नऊ घरात संपूर्ण चिखल व पाणी झाल्याने लहान बाळासह वयोवृद्धांचे हाल होत आहेत.

यावेळी बोलताना संदीपभाऊ शिंदे म्हणाले, ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष घालून घरे नियमित करण्याबाबतची सर्व माहिती वरिष्ठ पातळीवर दिली असती तर आज या नागरिकांना शासन निर्णयानुसार घरकुल मिळाली असती. आणि आज ही १२ कुटुंबे रस्त्यावर आली नसती. आज या नागरिकांच्या बेघर होण्यास शासन जबाबदार असून त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारून गरीब, मागासवर्गीय, मजूर काम करणाऱ्या लोकांना न्याय द्यावा. अशी मागणी संदीपभाऊ शिंदे यांनी केली. या वेळी ग्रामस्थ म्हणून वनिता जाधव यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, ज्या वेळेस पावसामुळे घराची भिंत कोसळली त्या वेळेस त्या ठिकाणी एक आई आपल्या बाळाला दूध पाजत होती. वेळीच तिच्या लक्षात आले आणि तिथून ती बाजूला सरकली आणि स्वतःचा व बाळाचा जीव वाचवु शकली. या दुर्घटनेत बाळाचा आणि त्या मातेचा जीव गेला असता तर त्याला कोण जबाबदार असतं ? असा प्रश्न करत येत्या काही दिवसात आमची घरे नियमित करून पक्की घरे जर दिली नाहीत तर आम्ही संपूर्ण ग्रामस्थ मरेपर्यंत उपोषण करणार आहोत असा इशारा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना वनिता जाधव व ग्रामस्थांनी दिला.

No comments