Header Ads

सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात भयावह पूरस्थिती maha

पुणे : दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या मुसळधार पावासामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये भयावह पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले असून शेकडो लोकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. या लोकांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे. या जिल्ह्यांमध्ये अन्य ठिकाणी पूराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, लष्कराचे जवान आणि नौदलाची पथकं कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत दाखल झाली आहेत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमधील शेकडो नागरिकांना आतापर्यंत सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी बोटीद्वारे पूरग्रस्तांना मदत देण्यास सुरुवात केली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी  नौदलाच्या दोन विमानातून एका बोटींसह २२ जणांचे पथक आणि गोवा कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर बोटीसह कोल्हापुरात दाखल झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद केल्यामुळे पाणी कमी होण्यास मदत होईल, अशी शक्यता होती. मात्र पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. त्यामुळे मदतकार्य करण्यासाठी लष्कर दाखल झाले असून लोकांना वाचवण्याचे काम सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या २०४ गावातून साधारण साडेअकरा हजार  नागरिकांचे  स्थलांतर करण्यात आले आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे अनेक भागात पुराचे पाणी शिरले आहे. नौदलाची सहा पथके राज्य सरकारने कोल्हापूरकडे मदतीसाठी रवाना केली आहेत. तर, कोयना आणि कृष्णा नदीला मोठा पूर आल्याने सातारा-कराड शहराला कृष्णा आणि कोयना नदीच्या पाण्याने वेढले आहे. कोयना, धोम धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात असल्याने कृष्णा आणि कोयना नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. राज्यातील ज्या भागांमध्ये पूर ओसरला आहे, अशा ठिकाणी आवश्यकत्या मुलभूत सुविधांसह वीजपुरवठा, आरोग्य सुविधा सुरळीत करण्यासाठी प्रशासनास सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, रत्नागिरी, पालघर, रायगड, सिंधुदूर्ग येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

No comments