Header Ads

महापुरात भावाप्रमाणेच धावून आलेल्या जवानांना बाधल्या राख्या maha

सांगली : यंदा स्वातंत्र्यदिनीच रक्षा बंधन आले आहे. कदाचित हा तिथीचा आणि तारखेचा योगायोग असू शकेल. स्वातंत्र्य दिन म्हटले की सैनिकांची आठवण होते आणि रक्षा बंधन म्हटले की बहिणीने भावाला आपली रक्षा करण्यासाठी बांधलेले बंधन आठवते. यंदाच्या महापुरात भावाप्रमाणेच धावून आलेल्या जवानांना राखी बांधून महिलांनी औक्षण करुन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत निरोप दिला. सांगलीच्या हिराबाग कॉर्नरला हा हृद्य सोहळा रंगला. सांगलीत गेले आठ दिवस महापुराने थैमान घातले. निम्मे शहर पाण्यात होते. हजारो नागरिक पुरात अडकून पडले होते. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही... अशा स्थितीत चार - पाच दिवस काढणाऱ्या शेकडो कुटुंबांना या प्रलयातून सुरक्षित वाचवण्यासाठी लष्कर, एसडीआरएफचे जवान धावून आले. आपला जीव धोक्‍यात घालून त्यांनी महिला, बालके, वृध्दांना सुरक्षित बाहेर काढले.

पाण्याचा अंदाज नाही, दिशा कळत नव्हती अशा स्थितीत नागरिकांना धीर देत, त्यांना पुरातून बाहेर काढणाऱ्या या जवानांना कशाची अपेक्षा असणार? केवळ कर्तव्यच नव्हे तर मानवतेच्या भावनेतून त्यांनी जणू आपलेच कुटुंबिय पुरात असल्याच्या भावनेने सांगलीकरांचे प्राण वाचवले. त्यांचे हे कार्य कुठल्या लढाईपेक्षा कमी नव्हते.  हिराबाग कॉनर्रवर असलेल्या जवानांनी गेल्या चार दिवसात जवानांनी आपल्या बोटीतून हरिपूर, सांगलीवाडीसह शहरातील विविध भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. आता पूर ओसरला आहे. जवानांनाही परतीचे वेध लागले आहेत. त्यांना त्यांच्या पोस्टींगच्या ठिकाणी जायचे आहे. आज सकाळी लष्कराच्या वाहनांमधून आपल्या बोटी घेऊन जवान परतू लागले. हिराबार कॉर्नर येथे नागरिक दोन्ही बाजूने त्यांना हात हलवून निरोप देत होते. हिराबाग चौकात जुन्या वाहतूक शाखेसमोर तर जवानांसाठी रक्षा बंधनाचा अनोखा सोहळा सुरु होता. महिलांनी जवानांना राखी बांधून औक्षण केले. त्यांचे तोंड गोड केले. जवानांनीही या भगिनींच्या प्रेमाचा स्वीकार केला.

"तुमच्यामुळे आम्ही आजचा दिवस पहात आहे. आज आम्ही जिवंत आहोत....' हे उद्‌गारही महिलांच्या तोंडून निघाले. एका वृध्द मातेला जवानांना निरोप देताना अश्रू अनावर झाले. तिचे सांत्वन करत जवानांनी तिला धीर दिला. या हृद्य सोहळ्यानंतर तरुणांनी जवानांसोबत छायाचित्र काढून त्यांची आठवणही जवळ ठेवून घेतली. भारत माता की जय, भारतीय सैन्याचा विजय असो.... अशा घोषणाही तरुणांनी देत वास्तवातील या "हिरो'ना निरोप दिला.

No comments