Header Ads

महापुरात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू ; सातारा जिल्ह्यात ७ मृत्यू,१ बेपत्ता maha

पुणे : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुण्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.

पुरामुळे सांगलीत १९, कोल्हापुरात ६, सातारा आणि पुण्यात प्रत्येकी ७ आणि सोलापूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात प्रत्येकी एक असे तीन व्यक्ती बेपत्ता आहेत. तसेच ब्रह्मणाळमध्ये आज ५ मृतदेह सापडल्याचं दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं. कोल्हापुरात २ लाख ४५ हजार २२९ जणांचं स्थलांतर करण्यात आलं असून सांगलीत ४ लाख ४१ हजार ८४५ जणांचं स्थलांतर करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. सांगलीत पाणी ओसरायला सुरुवात झाली असून सांगलीतील पाण्याची पातळी ५६ फुटावरून ५३ फुटावर आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख दिले जाणार आहेत. उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पूरग्रस्त कुटुंबांना रक्कम देताना बँकेकडून चेक किंवा बँक पासबुक मागण्यात येणार नाही. केवळ बँकेतील स्लीपवरून पैसे मिळणार आहेत. आधार कार्डवरून ओळख पटवली जाईल. एखाद्याकडे आधार कार्ड नसल्यास संबंधित पूरग्रस्त कुटुंबात या ओळखीच्या व्यक्तीचे आधार कार्ड पाहून रक्कम दिली जाणार असल्याचं म्हैसेकर म्हणाले.

No comments