Header Ads

पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा १६ फुटांवर karad

कराड : पावसाचा जोर ओसरल्याने बुधवारी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे १६ फुटांवरून १४ फुटापर्यंत कमी करण्यात आले होते. मात्र पावसाचा जोर वाढल्याने सायंकाळी साडेसहा वाजता धरणाचे दरवाजे पुन्हा एकदा 16 फुटांवर नेण्यात आले आहेत. त्यामुळेच कोयना नदीत धरणातून प्रतिसेकंद 1 लाख 23 हजार 823 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्‍यामुळे कोयनेसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, महापुराच्या धोक्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोयना धरणाचे दरवाजे मंगळवारी दुपारी चार वाजता साडेचौदा फुटांवरून दीड फुटाने वाढवत 16 फुटांवर नेण्यात आले होते. त्यानंतर सुमारे 15 तास धरणाचे दरवाजे स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र दरम्यानच्या कालावधीत पावसाचा जोर ओसरल्याने बुधवारी सकाळी अकरा वाजता धरणाचे दरवाजे सकाळी 11 वाजता दोन फुटांनी कमी करून ते चौदा फुटांवर नेण्यात आले होते. त्यामुळे 1 लाख 6 हजार 990 क्युसेक पाण्याचा प्रतिसेकंद विसर्ग वक्री दरवाजातून तर पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणाचे दरवाजे कमी करण्यात आल्याने, पुराचे पाणी चार फुटाने कमी झाल्याने आणि पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरल्याने कराडसह नदीकाठच्या गावातील लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र सायंकाळी साडेसहा वाजता धरणाचे दरवाजे पुन्हा 16 फुटांवर नेण्यात आले. यावेळी धरणातून कोयना नदीत प्रतिसेकंद 1 लाख 21 हजार 723 तर पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. त्यामुळेच कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून पुराचा धोका आणखी वाढला आहे.

No comments