Header Ads

तांबवे येथील जुना पुल कोसळला : सुदैवाने जीवितहानी नाही karad

कराड : गेली आठ दिवस महापुरात पाण्याखाली असलेला तांबवे (ता. कराड) येथील जुना पुल आज पहाटे पाचच्या सुमाराला कोसळला आहे. पुलाचे पिलर कमकुवत झाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून तो प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे अनर्थ टळला. कोयना नदीला यावर्षी  महापूर आल्याने याची झळ गावाला बसली आहे. यातच भर की काय म्हणून गेली अनेक वर्षे कोयना नदीवर खंभीरपणे उभा राहून प्रत्येक पुराशी दोन हात करणारा तांबवेचा जुना पूल अखेर बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोसळला. या पुलाच्या पिलरमध्ये भेगा पडून ते धोकादायक झाला होता. त्यामुळे पूल पडण्याची शक्यता गृहीत धरून गेल्या पंधरा दिवसांपासून बंद ठेवण्यात आला होता. कोयना नदीला आलेल्या महापुराचा तांबवे गावाभोवती गेली पाच दिवस विळखा पडला होता. यातून गाव सावरत होते त्यातच पूल कोसळण्याची घटना घडली.

पुलाच्या पश्चिमेकडील पहिल्या व दुसऱ्या पिलरचे बांधकाम सुटल्याचे समोर आले आहे. तब्बल ३८ वर्षे जुन्या असणाऱ्या या पुलाचा पिलर पावसाळाभर तब्बल तीन महिन्याहून अधिक काळ पाण्यातच असतो. बांधकाम विभागाने संबंधित पुलाची पावसाळ्यापुर्वी तपासणीच केली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. दरम्यान पुलाच्या जवळ कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. त्याचे पाणी आदळून वेगाने वाहते व पुलाजवळ उतार असल्याने पाण्याचा वेग जास्त असतो. त्या पुलावरुन वाहतूक सुरुच असल्याने पुल वाहुन दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला होता. तांबवे गावाला १९८० पूर्वी पूलच नव्हता. गावच्या चारी बाजुने पाणी असल्याने त्यावेळी गावची अवस्था बेटासारखी होती. त्यानंतर १९८१ साली कोयना नदीवर पूल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत ए. आर. अंतुले यांनी त्या पुलाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर तो पूल या परिसरातील १२ गावे आणि वाड्या वस्त्यावरील लोकांची चांगली सोय होवून ती गावे तालुक्याशी जोडली गेली. त्या पुलावरुन दुचाकीसह अवजड वाहनांचीही वाहतूक सुरु असते. त्यातच पावसाळ्यात अतीवृष्टी झाल्यावर या पुलावरुन पाणीही वाहते. त्यामुळे या पुलाच्या भक्कमतेची शंका ग्रामस्थांना होती. 24 जुलै रोजी निलेश भोसले यांनी या पुलाच्या पिलरचे छायाचित्र काढले होते. त्यात पुलाच्या पिलरचे बांधकाम ढिसाळ झाल्याचे दिसत आहे. त्यानंतर प्रशासनाने हा पूल वाहतूकीसाठी बंद केला होता. तसेच गेली आठ दिवस हा पूल महापुराच्या पाण्यात गेला होता. तीनच दिवसांपुर्वी या पुलावरील पाणी खाली गेले त्यावेळी पुलाची दुर्दशा झाली होती. काही अँगल वाहत गेले होते. मोठ्या भेगा पडल्या होत्या. पुलावर मोठे खड्डे पडले होते. तर आज पहाटे पूल कोसळला आहे. 

No comments