Header Ads

कुंभार व्यावसायिकांचे प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार ; ना.वायकर यांनी घेतली कराडातील कुंभार व्यावसायिकांची भेट karad

कराड : अलमट्टी धरणातून पाणी अडवल्यामुळे तसेच अतिवृष्टीमुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यास याचा फटका बसला आहे. कराड येथील कृष्णा कोयना नदीपात्रात गणेशमूर्ती बनवणाऱ्या व्यावसायिकांच्या गणेशमूर्तींचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई त्यांना मिळावी म्हणून मुंबई येथे मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. शिवसेनेचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी कराड येथील कुंभार व्यावसायिकांची सोमवारी भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी कराड  येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष शिवसेनेचे गटनेते नितीन बानुगडे-पाटील, शशिकांत हापसे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, कुंभार समाजबांधवांच्या वतीने मंत्री वायकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, गणेशोत्सव जवळ आला असल्याने त्यात पुरामुळे गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत संबंधितांनी आपल्या मागण्या शासनाकडे सादर कराव्या, त्याबाबत योग्य तो निर्णय लवकर घेऊन संबंधितांना नुकसान भरपाई दिली जाईल. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे म्हणाले, कऱ्हाड येथे सुमारे ३० ते ४० मूर्ती व्यावसायिकांकडून चारशे ते पाचशे लहान-मोठ्या मूर्ती बनविण्यात आल्या होत्या. मात्र, त्यातील सुमारे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याने प्रशासनाच्या वतीने त्याचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. याबाबतचा अहवाल प्रशासनाकडून लवकरच सादर केला जाईल. दरम्यान, कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांच्याकडे कुंभार समाजबांधवांनी आपली जमीन टेंभू प्रकल्पबाधितांना देण्यात आले असून, त्याचा मोबदला मिळण्याची मागणी केली. यावेळी पाटील यांनी कुंभार समाजाने याबाबत सविस्तर माहिती द्यावी, त्याचा पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे बानुगडे-पाटील यांनी सांगितले.

No comments