Header Ads

साताऱ्यातील दोघांना दुचाकी चोरीप्रकरणी अटक crime

सातारा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी साताऱ्यातील धनंजय राजेंद्र पंडीत (रा. शनिवार पेठ) आणि राजेश गणेश वंजारी (रा. गुरुवार पेठ) या दोघांना दुचाकी चोरीप्रकरणी अटक केली. अटकेतील दोघांकडून ३५ हजार किंमतीच्या दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय कुंभार यांना दुचाकी चोऱ्यांचा तपास करण्याचे आदेश दिले होते. यानुसार उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, हवालदार सुधीर बनकर, संतोष पवार, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, विशाल पवार, संजय जाधव हे दुचारी चोऱ्यांचा तपास करत होते. त्यांना साताऱ्यातील कमानी हौदाजवळ दोन युवक आढळले. त्यांच्याकडे असणाऱ्या दुचाकीबाबत विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी स्वत:ची नावे धनंजय पंडीत, राजेश वंजारी अशी सांगत दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यानुसार त्यांच्याकडून दोन दुचाक्या जप्त करण्यात आला. अटकेतील पंडीत, वंजारी यांचा ताबा शाहूपुरी पोलिसांकडे देण्यात आला आहे.

No comments