Header Ads

जन्मदात्या आईचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या मुलांवर गुन्हा दाखल crime

सातारा : जन्मदात्या आईस सांभाळण्यास नकार देत त्यांनाच मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देवून घरातील संसारोपयोगी साहित्य नेल्याप्रकरणी मुलगी आणि मुलावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मनोहर मोरे आणि मुलगी भारती जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून याप्रकरणी आई ललिता मोरे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलांवर 'ज्येष्ठ नागरिक व पालक पोषण, कल्याण अधिनियमा'नुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, ललिता सोनबा मोरे (वय ७५, मूळ रा. भाटमरळी, ता. सातारा. सध्या रा. गडकर आळी, शाहूपुरी, सातारा) यांच्या पतीचे निधन पाच वर्षांपूर्वी झाले असून त्यांना मुलगा मनोहर, तसेच सविता, सुरेखा, अनिता, भारती या मुली आहेत. यापैकी ललिता यांचा सांभाळ करण्यास कोणीही तयार नाही. परिणामी ललिता शाहूपुरीतील गडकर आळीत शंकर बजरंग कडव यांच्याकडे भाड्याच्या खोलीत राहून इतरांच्या घरी काम करुन स्वत:चा उदरनिर्वाह करत होत्या. तीन वर्षांपूर्वी मुलगा मनोहर सोनबा मोरे (रा. भाटमरळी, ता. सातारा) घरी आला आणि न विचारताच सिलिंडर घेवून गेला. यानंतर काही दिवसांनी मुलगी भारती जोतीराम जाधव (रा. गडकर आळी, सातारा) घरी आली आणि तिने घरातील गॅस शेगडी, टीव्ही, कपाट, पाण्याची स्टिलची टाकी न विचारताच नेली. मी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य 'तुझे नसून आमच्या बापाचे आहे,' असे धमकावत ललिता यांना मारहाण केली. संसारोपयोगी साहित्य जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ललिता यांनी विरोध केल्यानंतर संतापलेल्या मनोहर आणि भारतीने ललिता यांना लाथाबुक्­क्­यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, मी दोन ते तीनवेळा त्यांच्याकडे माझे साहित्य मागितले असता मला न जुमानता घरातूनही हाकलून दिले. मी ज्या ठिकाणी भाड्याने राहत आहे, तेथे कोणतेही संसारोपयोगी साहित्य माझ्याजवळ नसल्यामुळे मला घरी जेवणही बनवता येत नाही म्हणून मी खानावळ लावली आहे. मुलगा मनोहर आणि मुलगी भारती माझी कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. त्याचबरोबर आर्थिक मदतही करत नाहीत, असेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, ललिता यांनी मुलगा मनोहर आणि मुलगी भारती या दोघाच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आईला सांभाळण्यास नकार देणे, आर्थिक मदत न करणे, पालनपोषण न करणे, मारहाण, शिवीगाळ करून अनाधिकाराने त्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जबरदस्तीने घेऊन जाणे या आरोपाखाली मनोहर आणि भारतीवर गुन्हा दाखल केला आहे.

No comments