Header Ads

माणमधील ३२ गावांचा पाणीप्रश्न अखेर निकाली ; आ. जयकुमार गोरेंनी सादर केलेल्या 350 कोटींच्या योजनेला कॅबिनेटची मंजूरी khatav

खटाव : माण तालुक्याच्या उत्तर भागातील पाण्यापासून वंचित राहिलेल्या ३२ गावांना वरदान ठरणाऱ्या आंधळी धरणातून उचलून पाणी देण्याच्या योजनेला राज्याच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाने आज प्रशासकीय मान्यता दिली. आ.जयकुमार गोरे यांनी सादर केलेल्या या योजनेला ३५० कोटींचा निधीही जाहीर करण्यात आला. मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचे माण तालुक्यातील गावोगावी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले. दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांची लाईफलाईन ठरणाऱ्या जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी आ.जयकुमार गोरे यांनी गेल्या दहा वर्षांपासून अहोरात्र परिश्रम सुरु ठेवले आहेत. विधानसभेतील  पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात जिहेकठापूरसाठी त्यांनी  शेकडो कोटींचा निधी मिळवला होता. मात्र सुप्रमा नसल्याने मंजूर झालेला निधी खर्च करण्यात आला नव्हता. जिहे-कठापूर योजना पूर्ण झाली तरी माण तालुक्यातील ३२ गावे पाण्यापासून वंचित रहाणार होती. या गावांना पाणी मिळवण्यासाठी आमदारांनी प्रयत्न सुरु ठेवले होते.

आज मंत्रीमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयाविषयी अधिक माहिती देताना आ. गोरे म्हणाले,  मी विधानसभेत गेल्यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांना या रखडलेल्या योजनेचे माण-खटावसाठी मोठे महत्व असल्याचे पटवून दिले होते. मोठे प्रयत्न करुन चांगला निधीही मिळवला होता. या योजनेच्या वाढीव खर्चाला सध्याच्या युती  सरकारने सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. आजही माझ्या प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या निधीतूनच योजनेची कामे केली जात आहेत. जिहेकठापूर योजनेच्या पहिल्या टप्प्यात लवकरच  खटाव तालुक्यातील नेर धरणात पाणी आणून येरळा नदी प्रवाही करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात आंधळी धरणात पाणी आणून माणगंगा नदी प्रवाही करुन नदीवरील बंधारे भरुन घेण्यात येणार आहेत. मी  पाणीप्रश्नासाठी नेहमीच वाट्टेल तो त्याग करण्याची तयारी दाखवली आहे. लोकसभा निवडणूकीवेळीही मी पाणीप्रश्नासाठी संपूर्ण राजकीय कारकीर्द पणाला लावत खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपाची उमेदवारी मिळवून देण्यापासून त्यांना खासदार करण्यापर्यंत महत्वाची भूमिका निभावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही  माढ्याचा खासदार निवडून आणण्याचा शब्द दिला होता. मुख्यमंत्र्यांनीही आम्हाला माणखटावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लागेल ती मदत करण्याचा शब्द दिला होता. माण तालुक्याच्या उत्तर भागातील ३२ गावांना कोणत्याच योजनेचे पाणी मिळत नसल्याचे तसेच शेतकऱ्यांना आंधळी धरणातील पाणी उचलून नेण्याचे शक्य नसल्याचे सांगून जिहे-कठापूरची सुधारित ॲडिश्नल योजना त्यांच्यापुढे मांडली. आंधळी धरणात आलेले पाणी उचलून टाकेवाडी परिसरातील उंच ठिकाणी साठवून वंचित राहिलेल्या माणच्या उत्तर भागातील ३२ गावांना देण्यासाठी मी निधीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही दिलेला शब्द पाळत आज कबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत आम्ही सादर केलेल्या या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. योजना सादर झाल्यापासून सर्वेक्षण आणि इतर प्रशासकीय कारवाई पूर्ण होवून विक्रमी वेळेत मान्यता आणि निधी मिळणारी राज्याच्या इतिहासातील पहिलीच पाणीयोजना आज  मार्गी लागली.

आ. गोरे पुढे म्हणाले, या योजनेसाठी जलसंपदामंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठका झाल्या. मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून अधिकाऱ्यांना तांत्रिक बाबी पूर्ण करायला सांगितल्या. महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे महामंडळ, सिंचन भवन, आणि जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांना अहवाल सादर झाले. माण आणि खटाव तालुक्यांचा दुष्काळ हटविण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी माझ्या पाठपुराव्याला योग्य न्याय दिल्याने अनेक गावांचा पाणीप्रश्न आज मार्गी लागला आहे. आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे माणचा उत्तर भाग पाण्यापासून वंचित राहिला होता. मी जनतेला पहिल्यांदा उरमोडीचे पाणी आणण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण करुन आता जिहे-कठापूरचे पाणी माणगंगा नदीसह वंचित ३२ गावांना देण्याचा शब्दही पूर्ण होत आहे. या योजनेमुळे खटाव तालुक्यातील ११७००, माण तालुक्यातील १५८००० हेक्टर क्षेत्रासह आता उत्तर माणमधील वाढीव ३००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणारआहे. ही सुधारीत योजना मंजूर होताना प्रधान सचिव चहल, अधिक्षक अभियंता विजय घोगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही  मोठे  योगदान दिल्याचे  त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूकीवेळी घेतलेल्या निर्णयाने खूप काही दिले.......

लोकसभा निवडणूकीत आमदार जयकुमार गोरे यांनी खा.रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्याचा विडा उचलला होता. आमदारांच्या त्या निर्णयाची राज्यभर चर्चा झाली होती. अनेक रमलशास्त्र्यांनी आ.गोरेंनी मोठी रिस्क घेऊन संपूर्ण राजकीय कारकीर्दच पणाला लावल्याचे मत व्यक्त केले होते. "जितनी बडी रिस्क उतना बडा प्रॉफिट" असे कायमच म्हणणाऱ्या आ. गोरेंनी  लोकसभा निवडणूकीत मित्र रणजितसिंह निंबाळकर यांना खासदारपदी निवडून आणलेच आणि त्याबरोबर मतदारसंघ दुष्काळमुक्त करण्यासाठी जिहे-कठापूर आणि टेंभूचे पाणी माण आणि खटावमधील  वंचित ६४ गावांसाठी मिळवले.

उत्तर माणधील या गावांना मिळणार जिहेकठापूरचे पाणी.....

धुळदेव, हिंगणी, म्हसवड, भाटकी, खडकी, वरकुटे म्हसवड, पळशी, रांजणी, झाशी, राणंद, सोकासन, शेवरी, वडगाव, बिदाल, बोडकी, शिंदी, दहीवडी, गोंदवले बुदृक, गोंदवले खुर्द, मनकर्णवाडी, दानवलेवाडी, मार्डी, भालवडी, इंजबाव, संभुखेड, पर्यंती, हवालदारवाडी, या अंशता समावेश असणाऱ्या गावांबरोबरच खुटबाव, कारखेल, शिखरशिंगणापूर, वावरहिरे, लक्ष्मीनगर, तोंडले, जाधववाडी, राजवडी, मोगराळे, बिजवडी, पांगरी, टाकेवाडी, पाचवड, हस्तनपूर, थदाळे आणि वाड्यावस्त्यांना पाणी मिळणार आहे.

No comments