Header Ads

विधानसभेला सेना पूर्वीच्याच जागा लढवणार : ना. नितीन बानुगडे-पाटील satara

सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराला चांगली मते मिळाली असून जिल्ह्यात शिवसेनेला पोषक वातावरण आहे. लोकसभेत राहून गेलेल्या बाबींची दुरुस्ती करून विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीला शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून सामोरे जाणार आहे. जिल्ह्यातील पूर्वीचे  शिवसेनेकडे असणारे मतदारसंघ याही निवडणुकीत शिवसेनेकडेच राहतील, त्या मतदारसंघातून शिवसेनाच विधानसभा लढवणार असल्याची  माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. नितीन बानुगडे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आगामी विधानसभा निवडणुका लढवताना शिवसेनेची जिल्ह्यात व्यूहरचना काय राहील, या प्रश्‍नावर बोलताना ना. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांना युतीतूनच सामोरे जाणार आहोत. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे  तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. सातारा लोकसभा निवडणूक शिवसेना चुरशीने लढली. या निवडणुकीत सेनेला 4 लाख 50 हजार मते मिळाली आहेत.  त्यामुळे  ही परिस्थिती विधानसभेसाठी पोषक ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत राहून गेलेल्या गोष्टींची दुरुस्ती केली जाईल. विधानसभा निवडणुकीला आम्ही ताकदीने सामोरे जाणार  असून जिल्ह्यात कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांकडून मोर्चेबांधणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील किती व कोणते मतदारसंघ शिवसेनेकडे येतील, असे विचारले असता ना. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, युतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे पूर्वी जे मतदारसंघ होते तेच मतदारसंघ यावेळीही शिवसेनेकडे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांचे पदाधिकारी संपर्कात आहेत का? असे विचारले असता ना. नितीन बानुगडे-पाटील यांनी  बरेचजण शिवसेनेत येण्यासाठी संपर्कात आहेत. आगामी काळात चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.

महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत आठ जिल्ह्यांबाबत काय चर्चा झाली, असे विचारले असता ना. नितीन बानुगडे पाटील म्हणाले, दुष्काळ पडलेल्या संबंधित जिल्ह्यात  पाणी देण्यासंदर्भात काय नियोजन करण्यात आले आहे यावर चर्चा झाली. पाऊस पडेपर्यंत लोकांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. उपलब्ध पाणी लोकांपर्यंत कसे नेता येईल याबाबत अधिकार्‍यांना सुचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीला जादा पाणी देण्यात आले आहे का? त्याबाबत आरोप होत आहेत, असे विचारले असता ना. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याला लवादाप्रमाणे पाणी देण्यात आले आहे.  जिल्ह्यातील शेतीला लागणार्‍या पाण्याची रोटेशन पूर्ण केली आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले असून टँकर भरण्यासाठी पाणी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डी. एम. बावळेकर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments