Header Ads

सातारा-जावलीतील जनतेशी माझे आपुलकीचे सेटींग ; गरज सरो अन वैद्य मरो, ही खासदारांची जुनी सवय : आ.शिवेंद्रराजे satara

सातारा : लोकसभेच्या आधी उदयनराजेंची भाषा आणि वागणे कसे होते ? लोकसभा निवडणूक लागल्यानंतर त्यांची भाषा आणि वागण्यात कसा बदल झाला आणि लोकसभेच्या निकालानंतर त्यांची भाषा आणि वागणे कसे चालू आहे, हे सातारकर जनता बघत आहे. रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वादाशी माझा दूरवर कसलाही संबंध नाही. त्यामुळे माझे आणि रामराजेंचे सेटींग, संगनमत आहे, हे खासदारांचे विधान हास्यास्पद आहे. माझे सेटींग फक्त सातारा आणि जावलीतील जनतेशी आहे आणि तेही आपुलकी, प्रेम आणि विकासकामांपुरते आहे. गरज सरो अन वैद्य मरो, ही खासदारांची जुनी सवय असून त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना येत आहे, असे आ. श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे. खा.उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना आ. शिवेंद्रराजे आणि ना. रामाराजे यांच्यात संगनमत असल्याचे वक्तव्य केले होते. यासंदर्भात आ. शिवेंद्रराजे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले.

लोकसभा निवडणूकीत मी पक्षाशी प्रामाणिक राहून उदयनराजे यांचे काम केले. माझ्या मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्यावरुन ते सिध्द होत असून सातारकर जनतेनेही हे पाहिले आहे. लोकसभा निवडणूकीच्या आधी अगदी नगर पालिकेच्या निवडणूकीवेळी खा. उदयनराजे यांची भाषा आणि वागणे कसे होते, हे जनेतला चांगलेच माहिती आहे. लोकसभा निवडणूकीत त्यांच्यात कसा आणि किती फरक पडला हेही जनतेने जवळून पाहिले आहे आणि लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या वागण्यात, बोलण्यात काय बदल झाला आहे, हे सगळ्यांनाच दिसत आहे. निरा देवघरच्या पाण्याशी माझा आणि माझ्या मतदारसंघाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे उदयनराजे आणि रामराजे यांच्यात सुरु असलेले भांडण कशासाठी आहे हे मला माहिती नाही आणि माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

लोकसभा निवडणूकीनंतर माझ्या मतदारसंघात ज्या काही गोष्टी मला जाणवल्या त्या मी पक्षश्रेष्टी शरद पवार यांच्या कानावर घातल्या. मी काम केलं का नाही हे जनतेने पाहिले आहे आणि मताधिक्यावरुनही स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणूकीत उदयनराजे जे बोलत होते त्याप्रमाणे त्यांनी वागणे अपेक्षित आहे. मात्र खा. उदयनराजेंच्या वागण्यात आणि बोलण्यात आता फरक जाणवायला लागला आहे, हे जनताही पहात आहे. सातारकरांनाही हे चांगलेच माहिती आहे. कोण कसं वागतंय हे सातारकरांनी व सातारा- जावलीतील जनतेनं बघावं. कोणं कसं बदललयं हेही पहावं. मी सातारा- जावलीतील जनतेशी नेहमीच बांधिल राहिलो आहे आणि यापुढेही कायम बांधिल राहणार आहे. सातारकर आणि माझ्या मतदारसंघातील जनतेमुळेच मी आहे. हे मी कदापी विसरत नाही आणि त्यामुळेच माझ्या वागण्यात आणि बोलण्यात कधीही बदल दिसणार नाही. त्यामुळे खासदारांनी संबंध नसलेल्या गोष्टींशी माझा संबंध लावू नये आणि उगाच दिशाभूल करू नये, असे आ.शिवेंद्रराजे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

No comments