Header Ads

जवळवाडीच्या सावित्रींनी प्राणवायु देणारी झाडे लावुन साजरी केली वटपौर्णिमा ; पतींच्या स्मृती जपण्यासाठी केले वृक्षारोपण satara

सातारा : जवळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जात असुन, जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.वर्षा विलास जवळ यांच्या संकल्पनेतुन अकाली वैधत्व आलेल्या महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीच्या स्मृती अखंड रहाव्यात यासाठी आपल्या घराजवळ त्यांच्या नावे प्राणवायु देणारी झाडे लावुन या आधुनिक सावित्रींनी महाराष्ट्र राज्याला आदर्श ठरावा असा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.

वटपौर्णिमा म्हंटले की, आठवते सावित्री तिने यमाच्या दारातुन आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणल्याचे सांगितले जाते. वाढते प्रदुषण, अपघात, व्यसनाधिनता, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर याचा शेतीवर व पिकांवर होणारा परिणाम यामुळे कोणत्या माणसाला कोणता आजार होईल आणि जीवनावर काय परिणाम होईल याचा नेम नाही. दिवसेंदिवस प्राणवायु देणारी झाडे कमी होत असुन त्यामुळे प्रदुषण वाढत असुन पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. त्या सावित्रीने आपल्या सत्यवान नावाच्या पतीचे प्राण यमाकडुन परत मिळविले पण आता ते शक्य होणार नाही. पण आपल्या गेलेल्या पतीच्या स्मृती पित्यर्थ वटपौर्णिमेच्या दिवशी प्राणवायु देणारी वड, पिंपळ, कडुनिंब यांची  झाडे लावुन हजारो लोकांचे प्रदुषणाने होणारे पतन थांबविण्याचा छोटासा प्रयत्न केल्याचे या महिलांनी सांगितले. सामाजिक जाणिवेतुन जवळवाडी ग्रामपंचायतीने हाती घेतलेला हा उपक्रम समाजात एक आदर्श नक्कीच निर्माण करणार आहे. तुळसीला जसे रोज महिला पाणी घालतात त्याच पध्दतीने या रोपांना रोज या महिला पाणी घालणार असुन आपल्या पतीच्या स्मृती कायम या झाडाच्या रुपाने जपण्याचा प्रयत्न त्या करणार आहेत. या उपक्रमात फुलाबाई जगन्नाथ साखरे, मिराबाई ज्ञानदेव जवळ, भारती बबन जवळ, रंजना गणेश हिरवे, मंदा रामचंद्र जवळ, लक्ष्मी सर्जेराव जवळ या महिलांनी आपल्या पतीच्या स्मृतीपित्यर्थ वृक्षारोपन केले. यावेळी सरपंच वर्षा जवळ, सदस्या गिता लोखंडे, मा.सरपंच माधवी धनावडे, जयश्री जवळ, शालिनी जवळ यांच्यासह गावातील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

No comments