Header Ads

भिशी, खासगी फायनान्स कंपनी तसेच घोड्यांच्या रेसमध्ये बेटिंग करण्यास भाग पाडत साताऱ्यातील तिघांना २२ लाखांना गंडा ; संशयित शाहरुख बागवान अटकेत satara

सातारा : भिशी, खासगी फायनान्स कंपनी तसेच घोड्यांच्या रेसमध्ये बेटिंग करण्यास भाग पाडत साताऱ्यातील तिघांना २२ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यानुसार पोलिसांनी शाहरुख फारुख बागवान (रा. चैतन्य अपार्टमेंट, गुरुवार पेठ, सातारा) याला अटक केली असून त्याला दि. १८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, माची पेठेतील शिवसत्य अपार्टमेंटमध्ये निलेश विलासराव आपटे हे राहण्यास असून त्यांचा पोवईनाका येथे कॉस्मेटिकचा व्यवसाय आहे. त्यांचे आसिफ उस्मान शेख आणि शाहरुख फारुख बागवान (रा. चैतन्य अपार्टमेंट, गुरुवार पेठ, सातारा), संतोष कृष्णराव महाडिक (रा. वृंदावन वाटिका, गोडोली), विशाल नंदकुमार मेणकर (रा. मार्केट यार्ड, सातारा) हे मित्र आहेत. सप्टेंबर २0१६ मध्ये शाहरुख बागवान याने मावशी अनिसा आसिफ बागवान(रा.एनआयबीएम, कोंढवा, पुणे) हिने दर महिना २५ हजार रुपये प्रमाणे २४ महिन्यांची भिशी सुरु केली असून चिठ्ठीप्रमाणे नंबर ठरवून प्रत्येकाला पैसे दिले जातात. त्या भिशीतून इतरांना व्याजाने पैसे देण्यात येत असून त्यात गुंतवणूक केल्यास फायदा होईल, असे आपटेला सांगितले. त्यानुसार आपटे व विशाल मेणकर यांनी दर महिना २५ हजार प्रमाणे पैसे शाहरुख बागवानला जुना मोटार स्टँड येथील दुकानात देण्यास सुरुवात केली. एक नंबर कमी पडत असल्याचे शाहरुखने सांगितल्याने नंतर संतोष महाडिक यांनाही त्या भिशीत सामावून घेण्यात आले. तिघांचे जमा झालेले ७५ हजार शाहरुख दर महिना मावशी अनिसा हिच्याकडे देत असे. भिशी चालू झाल्यानंतर आपटेंसह इतरांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून किती महिन्यांनी पैसे परत मिळणार ते ठरविण्यात आले. ऑक्टोबर २0१६ मध्ये शाहरुखने आपटे आणि विशाल मेणकरला विश्वासात घेत पुणे येथे नेले. पुणे येथे माझे टेबल असून ते सासरे आसिफ कासम बागवान हे सांभाळतात. ते घोड्यांच्या रेसवर बेटिंग घेतात. तेथे २ लाख ११ हजार गुंतवल्यास दर महिना ४0 ते ५0 हजार मिळतील, असे शाहरुखने मेणकर यांना सांगितले. यानुसार आपटे यांनी २ लाख ११ हजार रुपये आसिफ बागवान यांच्याकडे दिले. भिशीचे दर महिना २५ हजार देणे शक्य नसल्याने शाहरुखने एका खासगी फायनान्स कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे सांगितले. यानुसार आपटेंनी १0 लाख, मेणकरांनी १ लाख १0 हजार त्यात गुंतवले. दोघांनी मिळून गुंतवलेले पैसे नंतर शाहरुखने खात्यावरुन काढून घेतले. पैसे गुंतवून दहा महिने झाले तरी परतावा मिळत नसल्याने त्यांनी शाहरुखकडे पाठपुरावा सुरु केला. यावेळी त्याने सदर कंपनी बुडाल्याचे आपटे, मेणकर यांना सांगितले. भिशीची मुदत संपल्यानंतर जमा झालेले तसेच रेसकोर्स व फायनान्स कंपनीत गुंतवलेले पैसे मागण्यास आपटे, मेणकर, महाडिक यांनी सुरुवात केली. पैसे देण्यास शाहरुख हा टाळाटाळ करत होता. यानंतर शाहरुखचे वडील व भावाची त्यांनी भेट घेतली. भेटीदरम्यान पैसे देणार नाही, असे म्हणत त्यांनी आपटे व इतरांना हाकलून दिले. शाहरुखने इतरांच्या मदतीने गंडा घातल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याची तक्रार मंगळवारी रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली. यानुसार शाहरुख फारुख बागवान, फारुख बागवान, नोएब बागवान, (सर्व रा. चैतन्य अपार्टमेंट, गुरुवार पेठ, सातारा) तसेच अनिसा बागवान (रा. पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शाहरुख बागवानला अटक केली आहे.

No comments