Header Ads

माण-खटाव विधानसभा मतदार संघातून शेखर गोरे महायुतीचे उमेदवार ? satara

सातारा : लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर आता युतीने आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतही शिवसेना भाजप एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले असून पन्नास-पन्नास टक्क्यांचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच दिली. या जागा वाटपात मित्रपक्षांसाठी १८ जागा सोडण्यात आल्या आहेत.

दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माण-खटाव विधान सभा मतदार संघातून भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून शेखर गोरे यांनी तर शिवसेनेकडून रणजीत देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. २०१४ साली सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्याने मतदानाची फार मोठी विभागणी झाली होती. मात्र आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचे प्रामाणिक काम केल्यानंतर माण-खटाव विधानसभा मतदार संघात नक्कीच परिवर्तन होईल अशी चर्चा सध्या मतदार संघात रंगताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर विजयी झाल्याने, माण-खटाव विधानसभा मतदार संघातून महायुतीकडून निवडणूक लढवण्यास अनेकांनी गुढग्याला बाशिंग बांधले आहे. मात्र शेखर गोरे यांच्या समर्थकांनी लोकसभा निवडणुकीत केलेले महायुतीच्या उमेदवाराचे प्रामाणिक काम व शेखर गोरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेली जवळीक पाहता २०१९ ची निवडणूक महायुतीकडून शेखर गोरेच लढवणार व जिंकणार असा चंग गोरे समर्थकांनी बांधला आहे. 

No comments