Header Ads

खांबाटकी बोगदा भूसंपादित शेतकर्‍यांनी मागितली इच्छामरणाची परवानगी satara

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणासाठी महामार्गालगतच्या शेतकर्‍यांनी जमीनी दिल्या. पण त्यांच पुर्नवसन व मोबदला अद्यापही मिळालेला नाही. अशा स्थितीत सातारा जिल्ह्यातील वाई- खंडाळा तालुक्यातील शेतकर्‍यांना आता खांबाटकी घाटातील नवीन बोगद्यासाठी जमीन द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांनी राष्ट्रपतीकडेच इच्छामरणाच्या परवानगीसाठी धाव घेतल्याने खळबळ माजली आहे.

वाई व खंडाळा तालुक्यातील वेळे, वाण्याचीवाडी, पारगांव खंडाळा येथील महामार्गानजीकच्या शेतकर्‍यांची यापूर्वीच शेकडो एकर जमीन गेली आहे. खंडाळा तालूक्यात औद्योगिक वसाहत, कालवा, महामार्ग आणि आता बोगद्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. भूसंपादन क्र. ९ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत शेतकर्‍यांच्या जमीन संपादन करण्याची घाई केली जात आहे. मुळातच येथील शेतकर्‍यांनी यापूर्वी एक गुंठा ते तीन एकर वडिलोपार्जित जमीन विकास कामासाठी दिली असली तरी त्याचा त्यांना मोबदला मिळालेला नाही. खांबाटकी बोगदा भूसंपादित शेतकर्‍यांचे निवाडे सहा महिन्यापूर्वी झाले असले तरी अद्याप त्यांना त्यांच्या जमीनीचे पैसे मिळालेले नाहीत. सर्व शेतकर्‍यांच्या जमापावत्यांवर सह्या घेण्यात आलेल्या आहेत. पण खात्यावर रक्कम जमा केलेली नाही. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या वेळे येथील रघूनाथ पवार व महादेव पवार यांचा अंत झाला असून दोन्ही कुटुंबिय उघड्यावर पडलेले आहेत. सध्या जगण्याचं साधन उरलं नसल्यामुळे या शेतकर्‍यांनी ठेवून एक जुलै पासून संविधानाच्या हक्कानुसार इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. भारत सरकारचे राष्ट्रपती, दळण-वळणमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण,वारजे, पुणे व सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन दिलेले आहे.

आज दुपारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्याकडे वाई व खंडाळा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने युवा नेते चिन्मय कुलकर्णी, शेतकरी प्रकाश धमू पवार, घनश्याम नवले, बाळू गायकवाड, विश्‍वास कोचळे, दत्तात्रय गायकवाड, बाबासाो पवार, राजेंद्र पवार, ज्ञानेश्‍वर गायकवाड, सचिन भिलारे, विजय मोरे, दिपक पवार, जयसिंग गायकवाड यांनी इच्छामरण पत्राच्या परवानगी मिळावी अशा निवेदनाची प्रत दिलेली आहे. सातारचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी अकरा वर्षापुर्वी भूमाता दिंडीच्या माध्यमातून खंडाळा तालूक्यातून शेतकर्‍यांच्या हक्कासाठी दिंडी काढली होती. यावेळी त्यांच्यासमवेत कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक व असंख्य समर्थक उपस्थित होते. त्यानंतर श्री. छ. भोसले यांनी खासदारकीची हॅट्रीक केली आहे. दूर्दैवाने त्याच खंडाळा तालूक्यातून महाार्गालगतच्या शेतकर्‍यांनी इच्छामरणाच्या परवानगीसाठी राष्ट्रपतीकडे धाव घेतल्याने शेतकर्‍यांची वस्तूस्थिती समोर आलेली आहे. याबाबत खा. श्री. छ. भोसले यांनी व्यक्तिगत लक्ष घालून आवाज उठवावा व खंडाळा तालुक्यातील शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी वाई व खंडाळा तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे.

No comments