Header Ads

सातारा पालिकेची धडक अतिक्रमण हटाव मोहीम satara

सातारा : साताऱ्यात पाण्याचा अपव्यय आणि अतिक्रमण या दोन्ही गोष्टींवर सातारा पालिकेने कडक निर्बंध लादले आहेत. लोणार गल्ली रविवार पेठ व पंचमुखी गणेश सदाशिव पेठ परिसरातील अतिक्रमणे शुक्रवारी दुपारी हटवण्यात आली. अतिक्रमण विभागाचे शैलेश अष्टेकर व प्रशांत निकम यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आली.

रविवार पेठ लोणार गल्ली येथे एका चुना व्यावसायिकाचे पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण होते. ते काढण्यासंदर्भात यापूर्वीच त्याला पालिकेने नोटीस बजावली होती. पाण्याच्या अपव्यय प्रकरणातही या व्यावसायिकाने पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना शिवीगाळ केली होती. त्याचे नळ कनेक्शन कट केल्याबरोबर लगोलग पालिकेने दहा कर्मचारी देउन रस्त्यात अडथळा करणारे पत्र्याचे शेड तोडून काढले. विरोध झाला पण कारवाईच्या तडाख्यात सगळयांचे अवसान गळाले आणि वेळेवर पोलीसांची कुमक ही उपलब्ध झाली. सदाशिव पेठ परिसरात पंचमुखी परिसरात केरसुणी विक्रेत्यांच्या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी होत असल्याची तक्रार लोकशाही दिनात करण्यात आली होती. त्या सूचनेची सातारा पालिकेने दखल घेउन तीन केरसुणी विक्रेत्यांचे सामान जप्त केले. पावसाळी हंगामाचा अपवाद वगळता ही अतिक्रमण हटाव मोहिम सुरूच ठेवण्याचे निर्देश मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिले आहेत.

No comments